कृतज्ञ सिंगापूरचा ली कुआन यांना निरोप

By admin | Published: March 30, 2015 01:28 AM2015-03-30T01:28:42+5:302015-03-30T01:31:10+5:30

मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो नागरिकांनी सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यांना अखेरचा अश्रूपूर्ण निरोप दिला.

Greetings to Singapore's Lee Kuan, thanks | कृतज्ञ सिंगापूरचा ली कुआन यांना निरोप

कृतज्ञ सिंगापूरचा ली कुआन यांना निरोप

Next

सिंगापूर : मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो नागरिकांनी सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यांना अखेरचा अश्रूपूर्ण निरोप दिला. ली यांच्या या भव्य अंत्ययात्रेसाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेते उपस्थित होते. आधुनिक काळातील सर्वाधिक महान नेते असा ली यांचा गौरव मोदी यांनी केला.
ली ९१ यांचे सोमवारी निधन झाले. ३१ वर्षे सिंगापूरचे पंतप्रधान असणाऱ्या ली यांना सिंगापूरचे शिल्पकार समजले जाते. छोट्या ब्रिटिश वसाहतीपासून सिंगापूरला आधुनिक समृद्ध देश बनविण्यात ली यांचा सिंहाचा वाटा होता. २३ मार्च रोजी न्यूमोनियाने त्यांचे निधन झाले, निधनानंतर संपूर्ण सिंगापूर शोकाच्या लाटेखाली गेले.
ली यांच्या अंत्यविधीसाठी जागतिक नेते, राजे, अध्यक्ष , पंतप्रधान व माजी नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे, इंडोनेशियाचे नेते जोको विडोडो व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हे ली यांच्या कुुटुंबियांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. अंत्यविधी सुरु होताच संरक्षणाचे सायरन सिंगापूरच्या सर्व वसाहतीत वाजविण्यात आले. त्याआधी मुसळधार पाऊस पडत असताना शवपेटी जात असलेल्या १५.४ कि.मी च्या मार्गात हजारो नागरिक रांगा लावून उभे होते. ली यांची शवपेटी सिंगापूरचा लाल व पांढरा ध्वज गुंडाळून तोफवाहक गाडीत ठेवली होती. तसेच पावसात भिजू नये म्हणून काचेचे आवरण घातले होते. संसद परिसरातून निघालेली अंत्ययात्रा मिरवणुकीने सिंगापूर विद्यापीठातील कल्चरल सेंटरमध्ये नेण्यात आली. तिथे अंत्यसंस्कार झाले.
ली यांचा मुलगा व पंतप्रधान ली हेसीन लुंग यांनी अत्यंत भावनावश असे ४० मिनिटे भाषण केले. इंग्रजी, मलय व चिनी भाषेत केलेल्या या भाषणात सिंगापूर हे ली यांचे आयुष्य होते, एवढेच नाही तर तो त्यांचा श्वास होता. आम्हाला मार्गदर्शन करणारा दीप आता विझला आहे, अशा भावना ली हेसीन लुंग यांनी व्यक्त केल्या .
सिंगापूरवर शोककळा
एरवी अत्यंत काटेकोर असणारे सिंगापूर आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना भावनावश झाले होते. संसदेच्या बाहेर पाडांग येथे जेव्हा अंत्ययात्रा आली तेव्हा हजारो लोक काळ्या कपड्यात पावसाचा मारा झेलत उभे होते. ‘थँक यू मि. ली’, ‘गुडबाय’, ‘टेक केअर’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मलय भाषेत मुक्त असा अर्थ असणारी ‘मरडेका, मरडेका’ ही घोषणाही लोक आवर्जून देत होते. ५० वर्षांपूर्वी सिंगापूरच्या स्वातंत्र्याची घोषणा करताना ली यांनी याच ठिकाणी केलेल्या भाषणात ‘मरडेका’ हा शब्द वापरला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Greetings to Singapore's Lee Kuan, thanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.