चीन-पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला मोठा धक्का! ग्वादर बंदरात ग्रेनेड हल्ला, 26 कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 03:47 PM2017-10-20T15:47:36+5:302017-10-20T15:58:14+5:30
पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर शुक्रवारी अज्ञात आरोपींनी ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले आहेत.
क्वेट्टा - पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर शुक्रवारी अज्ञात आरोपींनी ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामुळे सीपीईसी प्रकल्पाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सीपीईसी प्रकल्पात ग्वादर अत्यंत महत्वपूर्ण बंदर आहे. कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.
ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत. वसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली.
पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 पाकिस्तानी कामगारांची हत्या झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी लुचिस्तानमधुन दोन चीनी नागरीकांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावरुन चीनने पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. चीनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपायोजना करा अशी चीनने पाकिस्तानला सूचना केली होती. सध्या चीन आणि पाकिस्तानमध्ये सीपीईसी इकॉनॉमिक कॉरिडोअरचे काम सुरु आहे. या प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर विरोध होत आहे.
येणा-या काळात पाकिस्तानमध्ये चीनी नागरीकांची संख्या वाढणार आहे.
चीनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने या विषयावर लेख लिहीला होता. बलुचिस्तानमधून एका चीनी शिक्षिकेचे अपहरण करण्यात आले. मागच्यावर्षी दक्षिण पाकिस्तानात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका चीनी अभियंता जखमी झाला होता. सीपीईसी प्रकल्पाला विरोध करणा-या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती असे ग्लोबल टाइम्सने म्हटले होते. सीपीईसी प्रकल्पावर काम करणा-या चीनी नागरीकांच्या सुरक्षेसाठी 15 हजाराचे सशस्त्र दल तैनात करण्याचे आश्वासन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी चीनला दिले होते. जवळपास 8 हजार चीनी सध्या पाकिस्तानमध्ये या प्रकल्पावर काम करत आहेत.