‘गार्डियन’ देणार त्सुनामीची वेगवान पूर्वसूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 10:10 AM2023-06-02T10:10:53+5:302023-06-02T10:11:19+5:30
संशोधकांकडून नवी प्रणाली विकसित
वॉशिंग्टन : त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. हे नुकसान टाळता यावे, यासाठी त्सुनामीबाबत पूर्वसूचना देणारी प्रणाली अमेरिकेतील जेट प्रपोल्शन प्रयोगशाळेतील संशोधकांनी विकसित केली आहे.
जीपीएस आणि पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अन्य उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ही प्रणाली पूर्वसूचना देईल. या प्रणालीस ‘गार्डियन’ असे नाव दिले आहे. सध्या प्रशांत महासागरावरील रिंग ऑफ फायरमध्ये याची चाचणी सुरू आहे. सन १९०० ते २०१५ दरम्यान आलेल्या जवळपास ७५० पैकी सुमारे ७८ टक्क्यांहून अधिक त्सुनामी या प्रदेशात आल्या आहेत.
वेगवान प्रणाली
त्सुनामीसंदर्भात माहिती किंवा पूर्वसूचना देणाऱ्या आतापर्यंतच्या यंत्रणांपैकी ‘गार्डियन’ ही सर्वात वेगवान यंत्रणा आहे. पूर्वसूचनेबाबत आयनांबरामध्ये पोहोचणाऱ्या हवेच्या लाटेचा अवघ्या दहा मिनिटांमध्ये अंदाज लावू शकतो, असे संशोधकांनी म्हटले.
- त्सुनामीवेळी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग अचानक वर येऊ शकतो आणि लगेच खाली पडू शकतो. त्यामुळे त्या भागातील हवेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात विस्थापित होते.
- ही प्रणाली त्सुनामीमुळे वातावरणातील आयनांबरामध्ये विस्थापित होणारी हवा आणि भारीत कणांचे निरीक्षण करते.
- विस्थापिक हवा कमी वारंवारिता (लो-फ्रिक्वेन्सी) असलेल्या ध्वनी आणि गुरुत्वाकर्षण लहरींच्या स्वरूपाचे सर्व दिशेला प्रसारित होते.
- त्यामुळे भारीत कणांसह दबाव लहरींच्या संघर्षामुळे जीपीएस तथा नेव्हिगेशन उपग्रहांच्या सिग्नलसाठी अडथळा ठरतात.
- हाच अडथळा त्सुनामीची पूर्वसूचना म्हणून वापरला जात असल्याचे संशोधकांनी सांगितले.