अमेरिकेनंतर ग्वाटेमालानेही दुतावास जेरुसलेमला हलवला, नव्या घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 02:39 PM2018-05-17T14:39:24+5:302018-05-17T14:42:19+5:30
दोनच दिवसांमध्ये ग्वाटेमालाने आपला दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणल्याने यापुढे इतर देशही असेच करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जेरुसलेम- अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देऊन सोमवारी आपला दुतावास तेल अविवमधून तिकडे हलवला. अमेरिकेच्या या निर्णयाचे ग्वाटेमालानेही अनुकरण केले आहे. दोनच दिवसांमध्ये ग्वाटेमालाने आपला दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणल्याने यापुढे इतर देशही असेच करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या निर्णयानंतर पॅलेस्टीनी नागरिकांनी गाझा परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये 62 नागरिकांचे प्राण गेले. त्यामुळे ग्वाटेमालाबरोबर इतर देशांनीही जेरुसलेमला मान्यता दिली तर तणाव वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्वाटेमालाचा जेरुसलेममध्ये दुतावास सुरु करण्याच्या कार्यक्रमास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष जिमी मोरालेस उपस्थित होते. इस्रायल 1948 साली स्थापन झाल्यावर त्याला मान्यता देणारा ग्वाटेमाला हा दुसरा देश होता. इस्रायल आणि ग्वाटेमाला यांच्या मैत्रीचा इतिहासही मोठा आहे. मध्य अमेरिकेतील या देशाला इस्रायल मोठ्या प्रमाणात शस्त्रविक्री करतो. ग्वाटेमालाने घेतलेल्या निर्णयानंतर पेरुही मे महिन्याच्या शेवटपर्यंत आपला दुतावास जेरुसलेमला नेण्याची तयारी करत आहे, तशी घोषणाही पेरुने केली आहे. होंडुरास, चेक रिपब्लिक या देशांनीही आपले दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून कोणत्याही देशाने मान्यता दिली नव्हती. मात्र ट्रम्प प्रशासनाने 2017च्या डिसेंबर महिन्यामध्ये जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये तसा प्रस्तावही मांडला.