बेल्जीयम मराठी मंडळातर्फे परदेशात साजरा झाला गुढीपाडवा, विविध कार्यक्रमांची रेलचेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 05:07 PM2023-03-31T17:07:53+5:302023-03-31T17:35:29+5:30
कार्यक्रमाला भारतीय राजदूत संतोष झा आणि अनिवासी भारतीय परिषदेचे प्रमुख राकेश बन्सल यांची होती विशेष उपस्थिती.
Gudi Padwa 2023: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात २२ मार्च रोजी मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडव्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केले गेला. गुढीपाडवा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिथे-जिथे मराठी माणसे राहतात, तेथे हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाते. ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहात मिरवणूक निघते. महिलावर्ग नटून थटून शोभायात्रेत सहभागी होतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्याशिवाय प्रत्येक जण आपल्या घरात सुखाची-मांगल्यांची गुढी उभारतात आणि गुढीपूजन करून साकडे घालतात. या निमित्ताने बेल्जियममध्येही गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
भारतीय राजदूत संतोष झा (वरील फोटोत)
बेल्जियम मराठी मंडळाच्या वतीने बेल्जियममध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने भारतरत्न दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याशिवाय लहान मुलांसाठी 'डू इट युअरसेल्फ' अंतर्गत स्वत:ची स्वत: गुढी उभारण्याचे वर्कशॉप घेण्यात आले.
भारत स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आझादी का अमृतमहोत्सव हा कार्यक्रम करण्यात आला. त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय राजदूत संतोष झा आणि अनिवासी भारतीय परिषदेचे प्रमुख राकेश बन्सल यांची उपस्थिती होती.