14 देशातील 105 महिलांशी लग्न केलं; कोणालाही घटस्फोट दिला नाही, गिनीज बुकमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 03:10 PM2023-04-07T15:10:03+5:302023-04-07T15:10:50+5:30
Guinness World Records: महिलेशी लग्न केल्यानंतर पैसे घेऊन पळून जायचा. वाचा त्या कॉनमॅनची कहाणी...
Guinness World Records: जगभरात अनेक प्रकारचे रेकॉर्ड बनतात आणि मोडले जातात. या रेकॉर्ड्सची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) मध्ये केली जाते. अनेकजण यात आपले नाव नोंदवण्यासाठी विविध प्रकारचे रेकॉर्ड्स करण्याचा प्रयत्न करतात. काही जण सर्वात लांब नखांचा विक्रम करत आहेत, तर काहीजण सर्वात लांब दाढीचा विक्रम करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने सर्वाधिक विवाह करण्याचा विक्रम केला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ट्विटरवर या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जिओव्हानी विग्लिओटो(giovanni vigliotto) नावाच्या व्यक्तीची माहिती देण्यात आली आहे. असे म्हटले जाते की, त्याचे खरे नाव जिओव्हानी विग्लिओटो नव्हते, परंतु त्याने आपल्या शेवटच्या पत्नीशी लग्न करताना हेच नाव वापरले होते. त्याने 100 हून अधिक महिलांशी लग्न केले. हे विवाह 1949 ते 1981 दरम्यान झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने कोणत्याही पत्नीला घटस्फोट दिला नाही. यामुळेच त्याने सर्वाधिक लग्न करणाऱ्या व्यक्तीचा मान मिळवला.
वयाच्या 53 व्या वर्षी तो पकडला गेला. नंतर त्याने दावा केला की, त्यांचा जन्म 3 एप्रिल 1929 रोजी इटलीतील सिसिली येथे झाला होता. मग त्याने आपले खरे नाव निकोलाई पेरुस्कोव्ह सांगितले. नंतर एका फिर्यादीने सांगितले की, त्याचे खरे नाव फ्रेड झिप आहे आणि त्याचा जन्म 3 एप्रिल 1936 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. विग्लिओटोने 1949 ते 1981 दरम्यान 104-105 महिलांशी लग्न केले. त्यांच्या पत्नींपैकी कोणीही एकमेकांना ओळखत नव्हते. असे म्हणतात की, त्याने 14 देशांमधील महिलांशी लग्न केले. प्रत्येक वेळी तो खोट्या नावाने ओळखी करायचा.
To this day, nobody is sure of the real name of 'Giovanni Vigliotto' - the man who conned women and got married over 100 times. pic.twitter.com/MVFujTws5o
— Guinness World Records (@GWR) April 5, 2023
तो सर्व महिलांना चोर बाजारात भेटायचा आणि पहिल्या भेटीतच प्रपोज करायचा. लग्न झाल्यानंतर तो पत्नीचे पैसे व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायचा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, तो महिलांना सांगत असे की, तो खूप दूर राहतो, त्यामुळे तुझे सर्व सामान घेऊन माझ्याकडे ये. जेव्हा स्त्रिया त्यांचे सर्व सामान बांधून ट्रकमध्ये भरायच्या, तेव्हा विग्लिओटो त्यांचे सामान घेऊन निघून जायचा आणि पुन्हा त्यांना कधीय भेटायचा नाही. चोरीचा सर्व माल तो चोर बाजारात विकायचा.
तो कसा आणि कुठे पकडला गेला?
त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असूनही तो पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याचा शेवटचा बळी ठरलेल्या महिलेने त्याला अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये पकडले. शेरॉन क्लार्क असे या महिलेचे नाव असून ती इंडियानाच्या चोर मार्केटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. अधिकाऱ्यांनी 28 डिसेंबर 1981 रोजी विग्लिओटोला पकडले. त्यानंतर जानेवारी 1983 मध्ये त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला. त्याला एकूण 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. यामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षे तर एकापेक्षा जास्त विवाह केल्याप्रकरणी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासोबतच त्याला $336,000 चा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने आपल्या आयुष्यातील शेवटची 8 वर्षे ऍरिझोना राज्य कारागृहात घालवली. 1991 मध्ये वयाच्या 61 व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे निधन झाले.