आयुक्तांच्या श्वानाने वाढविले ‘टेन्शन’; पाकिस्तानात घराेघरी शाेधाशाेध, ४ लाखांचा श्वान हरवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:45 AM2021-07-30T06:45:48+5:302021-07-30T06:46:42+5:30
गुजरानवालाचे आयुक्त झुल्फीकार अहमद घुमान यांच्याकडील पाळीव श्वान हरवला.
लाहाेर : पाकिस्तानातील गुजरानवाला शहरात पाेलीस दाराेदारी अन् घराेघरी माेठी शाेधमाेहीम राबवित आहेत. एवढेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवर या शाेधमाेहिमेच्या ब्रेकिंग न्यूजही चालवण्यात येत आहे. ही काही एखादा गुन्हेगार किंवा दहशतवाद्यासाठीची शाेधमाेहीम नाही. तर चक्क एका ‘व्हीआयपी’ श्वानाचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांकडून ही कसरत सुरू आहे.
गुजरानवालाचे आयुक्त झुल्फीकार अहमद घुमान यांच्याकडील पाळीव श्वान हरवला. जर्मन शेफर्ड जातीचा हा श्वान तब्बल ४ लाख रुपयांचा आहे. त्याला २४ तासांमध्ये शाेधून काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यामुळे अख्खे प्रशासन त्याला शाेधण्यात व्यस्त झाले. पाकिस्तानातील नागरिकांनी या प्रकारावरून प्रशासनाचे चांगलेच पाय खेचले. एखादा दहशतवादी, गुन्हेगार किंवा बलुचिस्तानातील एखाद्या कार्यकर्त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शाेधमाेहिमेशी त्यांनी तुलना केली. त्यावरून अनेक मिम्सही व्हायरल झाले.
म्हशींच्या घटनेची आठवण
या प्रकरणावरून समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या हरविलेल्या म्हशींच्या शाेधमाेहिमेचे स्मरण अनेकांना झाले. २०१४ मध्ये हा प्रकार घडला हाेता. त्यांना शाेधण्यासाठी संपूर्ण पाेलीस यंत्रणा कामाला लागली हाेती. त्यामुळे आयुक्त घुमान यांचा ‘पाकिस्तानचे आझम खान’ म्हणून अनेकांनी उल्लेख केला. या दाेन्ही घटनांची तुलना करून अनेकांनी ट्वीट केले.