माथेफिरूच्या गोळीबारात तेरा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:59 AM2020-04-21T00:59:51+5:302020-04-21T01:00:28+5:30
कॅनडात १२ तासांत हत्याकांड
हेलिफॅक्स (कॅनडा) : कॅनडाच्या अटलांटिक महासागरच्या किनाऱ्यावर असलेल्या नोव्हा स्कॉटिया या राज्यात एका माथेफिरूने १२ तासांच्या अवधीत अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार करून किमान १३ निरपराधांची शनिवारी हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. मृतांमध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.
व्यवासायाने दातांचा डॉक्टर असलेला गॅब्रियल वॉर्टमन नावाचा हा ५१ वर्षांचा माथेफिरु ठार झाला असल्याने त्याच्यापासूनचा धोका संपुष्टात आला आहे, असे रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस दलाच्या प्रमुख ब्रँडा ल्युक्की यांनी जाहीर केले. मात्र गॅब्रियलचा मृत्यू कसा झाला, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही.
मृत्यू झालेल्या २३ वर्षीय महिला पोलिसाचे नाव हेदी स्टीव्हन्सन असे असून तिला दोन लहान मुले आहेत.
अमेरिकेच्या तुलनेत शस्त्र जवळ बाळगण्याचे अधिक कडक कायदे असलेल्या कॅनडामधील गेल्या ३० वर्षांतील हे सर्वात भयानक हत्याकांड आहे. याआधी सन १९८९ मध्ये मॉन्ट्रियल शहरांत एका बंदुकधाºयाने एकाच ठिकाणी गोळीबार करून १५ महिलांचे हत्याकांड केले होते.
हेलिफॅक्स या प्रांतीय राजधानीपासून १३० किमी उत्तरेस असलेल्या पोटार्पिक्व या किनाºयावरील शहरात पोलिसांची गॅब्रियलशी समोरासमोर गोळीबाराची चकमकही झाली. परंतु त्यातच मारला गेला किंवा कसे हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही. (वृत्तसंस्था)
हेतू अद्याप स्पष्ट नाही
गॅब्रियलने नोव्हा स्कॉटियामधील अनेक ठिकाणी शनिवारी सुमारे १२ तासांच्या कालावधीत या हत्या केल्या. त्यामुळे या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे दुवे जोडून संपूर्ण चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागला.
ज्यांच्या हत्या झाल्या त्यांचा गॅब्रियलशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे या हत्याकांडाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
हा बंदूकधारी अनेक ठिकाणी पोलिसांच्या गणवेशाशी साधर्म्य असलेले कपडे घालून व त्यांच्या वाहनासारख्या दिसणाºया वाहनांतून फिरत होता, अशी माहितीही समोर आली आहे.