रशियात दहशतवादी हल्ला, सहा पोलिसांसह १५ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 09:17 AM2024-06-24T09:17:03+5:302024-06-24T09:24:42+5:30

या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Gunmen Attack Churches, Synagogues In Russia; Cops, Priest Among 15 Killed | रशियात दहशतवादी हल्ला, सहा पोलिसांसह १५ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

रशियात दहशतवादी हल्ला, सहा पोलिसांसह १५ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

रशियाच्या उत्तर काकेशस प्रदेशातील दागिस्तानमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी एक सिनेगॉग, दोन चर्च आणि एका पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सहा पोलीस अधिकारी, चर्चमधील एका फादर यांच्यासह जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ हून अधिक जण जखमी झाले. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

रशियन पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्यांचा तपास सुरू केला आहे. सिनेगॉग आणि चर्च हे डर्बेंटमध्ये आहे. याठिकाणी मुस्लिम उत्तर काकेशस प्रदेशातील प्राचीन ज्यू समुदायाचे केंद्र आहे. तर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेली पोलीस चौकी दागिस्तानची राजधानी मखाचकला येथे आहे. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

काही अज्ञात हल्लेखोरांनी  सिनेगॉग आणि चर्चवर ऑटोमॅटिक शस्त्रांनी गोळीबार केल्याचे रशियन गृह मंत्रालयाने सांगितले. तर सीएनएनने दागिस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलेव यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'मला मिळालेल्या माहितीनुसार फादर निकोले यांची डर्बेंटच्या चर्चमध्ये हत्या करण्यात आली होती. ते ६६ वर्षांचे होते आणि खूप आजारी होते.

याशिवाय,दक्षिण काकेशसमधील ज्यू समुदायाच्या एका प्राचीन सिनेगॉगमध्ये हल्ला केल्यानंतर आग लागल्याचे वृत्तसंस्था रॉयटर्सने दिले आहे. हल्ल्यातील जखमींमध्ये बहुतांश पोलीस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या हल्ल्यानंतर रशियन कमांडोने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर मखाचकला येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी चर्चवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्यानंतर  लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस 'शोक दिवस' घोषित करण्यात आले आहेत.

Web Title: Gunmen Attack Churches, Synagogues In Russia; Cops, Priest Among 15 Killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.