Gupta brothers arrested: दक्षिण आफ्रिकेतून फरार गुप्ता ब्रदर्स UAE मध्ये अटकेत, अब्जो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 11:02 AM2022-06-07T11:02:13+5:302022-06-07T11:02:26+5:30
Gupta brothers arrested: मूळचे भारतीय असलेले आणि दक्षिण आफ्रिकेत व्यवसाय करणाऱ्या फरार गुप्ता ब्रदर्सला UAE मध्ये अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांच्या काळात अब्जो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
Gupta brothers arrested: दक्षिण आफ्रिकेतून पळून गेलेल्या गुप्ता बंधूंना(Gupta brothers) सोमवारी यूएईमध्ये(UAE) अटक करण्यात आली. राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता यांच्यावर आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींच्या काळात 500 अब्ज रँड (32 अब्ज अमेरिकन डॉलर) हडप केल्याचा आरोप आहे. गुप्ता बंधूंना इंटरपोलच्या मदतीने पकडण्यात आले. खुद्द दक्षिण आफ्रिकेनेच याबाबत माहिती दिली आहे.
गुप्ता बंधूंवर काय आरोप?
दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने सोमवारी सांगितले की, यूएईमधील अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी गुप्ता बंधूंना (राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता) अटक केली आहे. मात्र, तिसरा भाऊ अजय गुप्ता याला अटक का करण्यात आली नाही, हे स्पष्ट करण्यात आले नाही. गुप्ता बंधूंवर दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आरोप आहे. याचा आर्थिक फायदा घेत वरिष्ठ पातळीवरील नियुक्त्यांमध्येही त्यांनी भूमिका बजावली होती.
कोट्यवधी रुपये घेऊन फरार
अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, 2018 मध्ये गुप्ता कुटुंबाने दक्षिण आफ्रिका स्वतःहून सोडली आणि दुबईला (स्व-निर्वासित) गेले. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत अब्जावधी रँड (आफ्रिकन चलन) लुटले होते. आफ्रिका इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्स अब्यूज इन्व्हेस्टिगेशनचे सीईओ वेन डुवेनहेज यांनी आरोप केला की, गुप्ता बंधूंनी आफ्रिका सोडण्यापूर्वी 15 अब्ज रँड (आफ्रिकन चलन) लुटले.
लवकरच दक्षिण आफ्रिकेत नेणार
INTPOL ने गुप्ता बंधूंविरोधात यापूर्वीच रेड नोटीस जारी केली होती. अमेरिका आणि ब्रिटननेही त्याच्या येण्यावर बंदी घातली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये गुप्ता कुटुंब दक्षिण आफ्रिकेतून पळून गेले होते. त्यादरम्यान जेकब झुमा यांच्या विरोधात देशभर निदर्शने झाली. जेकब झुमा यांच्या जागी सिरिल रामाफोसा यांना राष्ट्राध्यक्ष बनवावे, अशी मागणी जनतेतून होत होती. आता गुप्ता बंधूंना दक्षिण आफ्रिकेत परत नेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचे रहिवासी
गुप्ता कुटुंब भारतातील सहारनपूर येथील रहिवासी आहे. 1990 च्या सुमारास त्यांनी दक्षिण आफ्रिकेत बूटांचे दुकान उघडले. त्यानंतर कुटुंब तेथे जाऊन स्थायिक झाले. नंतर गुप्ता कुटुंबाने आयटी, मीडिया आणि खाण कंपन्याही उघडल्या. आता यापैकी बहुतेक कंपन्या विकल्या गेल्या आहेत किंवा बंद पडल्या आहेत. त्यांच्या संपूर्ण घोटाळ्यात बँक ऑफ बडोदाचे नावही आले होते. दक्षिण आफ्रिकेत त्यांची बँक खाती बंद करण्यात आली तेव्हा बँक ऑफ बडोदाने त्यांना मदत केल्याचे समजले. पण, नंतर बँक ऑफ बडोदाने दक्षिण आफ्रिकेतील आपले कामकाज बंद केले.