ग्वादर बंदर आणि हिंदी महासागरात वाढणार चिनी ड्रॅगनची वळवळ
By admin | Published: March 15, 2017 12:29 PM2017-03-15T12:29:12+5:302017-03-15T12:29:12+5:30
भारताशेजारच्या सागरांमधील चीनच्या हालचाली पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. चीनने परदेशातील तळांवरील नौसैनिकांच्या संख्येत मोठ्या
Next
>ऑनलाइन लोकमत
पेईचिंग, दि. 15 - भारताशेजारच्या सागरांमधील चीनच्या हालचाली पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. चीनने परदेशातील तळांवरील नौसैनिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याची योजना आखली असून, त्याअंतर्गत चीन देशाबाहेरील सैनिकांची संख्या 20 हजारांवरून एक लाखापर्यंत वाढवणार आहे.
चीन आपल्या देशाबाहेर जिथे सैनिकांची संख्या वाढवणार आहे त्यामध्ये बलुचिस्तान येथील ग्वादर बंदर आणि हिंदी महासागरातील जिबुटी मिलिट्री लॉजिस्टिक्स तळ यांचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून चीनने आपल्या नौदलाच्या विस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. मात्र चीनच्या ग्वादर बंदर आणि हिंदी महासागरातील वाढत्या सैनिकी हालचालींमुळे भारतासमोरील धोका वाढला आहे.
ग्वादर बंदर हे इराणकडे जाणाऱ्या सागरी मार्गावरील एक महत्त्वाचे बंदर असून, या सागरी मार्गावरूनच तेलवाहतूक होत असते. पाकिस्तानमधील हे बंदर विकसित करण्यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. तसेच हे बंदर चीन आणि पाकिस्तानमध्ये विकसित होत असलेल्या आर्थिक क्षेत्रासाठीही सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. चीनच्या हालचालींमुळे येथे चिनी सैन्याची तैनाती झाली नाही तरी चिनी नौदलाच्या नौका येथे दिसू लागणार आहेत
चीनबरोबरच पाकिस्तानही या क्षेत्रात आपल्या 15 हजार सैनिकांचे विशेष सुरक्षा पथक तैनात करणार आहे. या पथकामध्ये नऊ हजार सैनिक आणि सहा हजार अर्धसैनिक बलातील सैनिकांचा समावेश असेल. हे पथक चीन आणि पाकिस्तानमधील आर्थिक क्षेत्राचे संरक्षण करणार आहेत.