झोमॅटोची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी युझर्सचा डेटा चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 01:34 PM2017-05-18T13:34:45+5:302017-05-18T13:58:44+5:30
झोमॅटो या फूड-टेक कंपनीची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - अनेक देशांमधल्या 10 हजारांहून अधिक शहरांतील ग्राहकांची खाण्याची चंगळ पुरवणा-या झोमॅटो या फूड-टेक कंपनीची वेबसाइट हॅक करून 1.7 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. झोमॅटो या वेबसाइटवरून 1.7 कोटी युझर्सचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरण्यात आले आहेत.
झोमॅटो फूड टेक कंपनी युझर्सना त्यांच्या शहरांतील हॉटेल, खाण्यांसह इतर ठिकाणांची माहिती पुरवते. कंपनीच्या वेबसाइटवरून मागवलेले पदार्थ घरपोचही पाठवले जातात. मात्र ही सुविधा मिळवण्यासाठी युझर्सला आधी वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. यूझर्सचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता आदी माहिती साइटवर नोंदणीसाठी द्यावी लागते. भारतातही मोठ्या प्रमाणात या वेबसाइटचा वापर केला जातो. ही वेबसाइट हॅक झाल्यामुळे जवळपास 1 कोटी 70 लाख युझर्सचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरल्याची माहिती हॅकरीड या सिक्युरिटी ब्लॉगकडून देण्यात आली आहे.
वेबसाइट हॅक करून हॅकर्सनं युझर्सची सर्व माहिती मिळवली आहे. झोमॅटो या कंपनीविरोधात भारतीय कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. या कायद्यांतर्गत वेबसाइटच्या असुरक्षिततेमुळे युझर्सची माहिती चोरीला गेल्यामुळे युझर्सला कंपनीकडून नुकसानभरपाईही दिली जाऊ शकते. या वेबसाइटचा दर महिन्याला 9 कोटी युझर्स फायदा उचलतात, असेही कंपनीनं सांगितलं आहे. युझर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यूझर्सचे ई-मेल आयडी आणि इतर डेटा चोरला असला तरी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती आणि इतर अर्थिक बाबींची माहिती सुरक्षित असल्याचीही कंपनीनं म्हणणं आहे. तसेच युझर्सनं घाबरून न जाता सामोपचाराची भूमिका घ्यावी, असंही कंपनीनं म्हटलं आहे.