काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 05:57 PM2018-06-25T17:57:40+5:302018-06-25T17:58:07+5:30
मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे.
लाहोर- काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याचे वक्तव्य कुख्यात दहशतवादी आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याने केले आहे.
''काश्मीर स्वतंत्र होणे ही देवाची इच्छा असून आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात फार रक्तपात झाला आहे. सर्वशक्तीमान असा देव हे सगळं पाहात आहे. तो लवकरच त्याचा निवाडा देईल, हे निवाडे स्वर्गातून येतात, वॉशिंग्टन वरुन नाही. त्या निवाड्यामुळेच काश्मीर स्वतंत्र होईल''. हाफिज सईदने हे गरळ लाहोरच्या गड्डाफी मैदानात भाषण करताना ओकले आहे.
''भारतीय लष्कराने दगडफेक करणाऱ्या काश्मीरींना ठार मारले आहे, हे सगळे देव पाहात आहे. मरतानासुद्धा हे लोक पाकिस्तान आणि काश्मीर एक व्हावेत असी भाषा करत आहेत ही सगळी नव्या काश्मीरची नांदी आहे. आणि हा भारताचा पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आम्हाला थांबवू शकत नाही. कारण ही सगळी देवाचीच इच्छा आहे. सगळे निर्णय व निवाडे देवाच्या इच्छेनेच होतात. ''अशा विखारी शब्दांमध्ये हाफिजने भाषण केले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकांसाठी प्रचार सुरु आहे.हाफिज सईद आपल्या जमात उद दवाच्या लोकांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये निवडून पाठविण्याची धडपड करत आहे. त्याचा मुलगा व जावईसुद्धा निवडणुकीत उतरले आहेत. तसेच त्याच्या पक्षाचे संसदेच्या व प्रांतीय सरकाराच्या निवडणुकासांठी 265 उमेदवार लढत आहेतय