Hafiz Saeed: मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 09:43 PM2022-04-08T21:43:16+5:302022-04-08T21:43:39+5:30
Hafiz Saeed: मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानी कोर्टाने विविध प्रकरणात 68 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
लाहोर: भारताचा मोस्ट वाँटेड पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला(Hafiz Saeed) लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 3 लाख 40 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर दहशतवादी हाफिज सईदची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हाफिज सईदला टेरर फंडिंगशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड
जमात-उद-दावा (JUD) प्रमुख हाफिज सईदला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्या डोक्यावर 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा इनामही ठेवला आहे. हाफिज सईद 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वॉन्टेड आहे. मुंबईच्या ताज हॉटेमध्ये झालेल्या त्या हल्ल्यात 161 लोक मारले गेले होते.
Pakistan anti-terrorism court sentences Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed to 31 years in jail: Pakistan media
— ANI (@ANI) April 8, 2022
(file pic) pic.twitter.com/ndrNG6dmzK
एकूण 68 वर्षांची शिक्षा
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला अशाच अन्य पाच प्रकरणांमध्ये 36 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. म्हणजेच एकूण 68 वर्षांच्या कारावासाची शिक्षा एकत्रितपणे चालेल. एका वकिलाने सांगितले की, सईदला अनेक वर्षे तुरुंगात घालवावी लागली नाही कारण त्याची शिक्षा एकाचवेळी चालणार आहे.
सईद 2019 पासून तुरुंगात
शुक्रवारी दहशतवाद विरोधी न्यायालयाचे (ATC) न्यायाधीश एजाज अहमद यांनी सईदला पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने नोंदवलेल्या दोन FIR 21/2019 आणि 90/2019 मध्ये शिक्षा सुनावल्याचे सांगितले. सईद जुलै 2019 पासून कोट लखपत या तुरुंगात कैद आहे. सईद लाहोरहून गुजरानवालाला जात असताना जुलै 2019 मध्ये दहशतवादविरोधी विभागाने (CTD) त्याला अटक केली होती.