हाफीज सईदवर आरोप निश्चिती नाही; पुढील सुनावणी ११ डिसेंबरला होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:30 AM2019-12-08T02:30:22+5:302019-12-08T06:05:54+5:30
खटल्यातील एका सह-आरोपीला अधिकारी शनिवारी न्यायालयात आश्चर्यकारकरीत्या हजर करू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. .
लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयात मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड व प्रतिबंधित जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईद याच्याविरुद्ध टेरर फंडिंग प्रकरणात आरोप निश्चित होऊ शकले नाहीत. या खटल्यातील एका सह-आरोपीला अधिकारी शनिवारी न्यायालयात आश्चर्यकारकरीत्या हजर करू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक व अन्य एक सहआरोपी मलिक जफर इकबाल याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी आता ११ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे.
न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार हाफीज सईद व इतरांच्या विरोधात टेरर फंडिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात येणार होते; परंतु आश्चर्यकारकरीत्या सहआरोपी मलिक जफर इकबाल याला जेलमधून न्यायालयात हजर करण्यात आले नाही. त्यामुळे आता आरोप निश्चितीसाठी ११ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीच्या वेळी हाफीज सईद याला लाहोरच्या कोट लखपत जेलमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात आणण्यात आले होते.
न्यायालयाच्या अधिकाºयाने सांगितले की, न्या. अरशद हुसेन भुट्टा यांनी इकबाल याला ११ डिसेंबर रोजी निश्चितरीत्या आणण्यात यावे, याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.