ही तर फक्त सुरुवात आहे, इमरान खानची शरीफ यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 10:17 PM2017-07-28T22:17:24+5:302017-07-28T22:17:54+5:30
पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यानं माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
इस्लामाबाद, दि. 28 - पाकिस्तानच्या विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान यानं माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. पनामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इमरान खान यांनीही नवाज शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत त्यांनी शरीफ यांना सूचक इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दोषी ठरवल्यानंतर 64 वर्षांच्या इमरान खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना न्याय व्यवस्थेचे आभारही मानले आहेत. पाकिस्तानच्या तहरिक ए इन्साफ पार्टीच्या अध्यक्षांनी रविवारी इस्लामाबादच्या परेड ग्राऊंडमध्ये आभार प्रदर्शनासाठी रॅलीचं आयोजनही केलं आहे.
खान म्हणाले, संयुक्त तपास पथकानं 60 दिवसांत जे केले ते कोणालाही शक्य नव्हतं. या निर्णयानंतर स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तानकडे भ्रष्टाचार रोखण्याची क्षमता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये न्याय व्यवस्थेप्रति विश्वास निर्माण झाला आहे. मी पाकिस्तानमधील लोकशाही, गरिबांच्या सशक्तीकरणासाठी संघर्ष केल्याचंही ते म्हणाले आहेत. शरीफ यांच्या परिवाराला मी 40 वर्षांपासून ओळखतो आहे. माझी त्यांच्या परिवाराशी कोणतंच वैयक्तिक वैर नाही.
पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.
काय आहे पनामागेट प्रकरण ?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत.
मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती. ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.