हायफा; भारतीय सैनिकांनी रक्त सांडलेली पावनयुद्धभूमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:41 AM2018-09-21T11:41:16+5:302018-09-21T11:46:45+5:30
तत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानांना विनंती केली.
मुंबई- इस्रायल आणि भारत यांचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वृद्धींगत होत आहेत. इस्रायलमध्ये १०० वर्षांपुर्वी भारतीय सैनिक लढण्यासाठी गेले होते हे आपल्याला माहिती नसते. हायफा हे पर्यटकांसाठी एक आकर्षण म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यापूर्वी २३ सप्टेंबर १९१८ रोजी झालेल्या घटनेबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. दोनच दिवसांनी या लढाईला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
तत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानांना विनंती केली. जोधपूर व म्हैसूर संस्थानाच्या सैनिकांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेतला. बलाढ्य शत्रूविरोधात लढताना हायफा शहरात घुसण्याचा निर्णय भारतीय सैनिकांनी घेतला. १५ हजार भारतीय सैनिक शहरात घुसले. इम्पिरियल सर्विसच्या १५ व्या घोडदळाने पहाटे हायफाच्या दिशेने कूच केले आणि सकाळी १० वाजेपर्यंत शहराच्या मुख्यद्वारापर्यंत मजल मारली.
लढाईच्या सुरुवातीसच कर्नल ठाकूर दलपत सिंह यांना हौतात्म्य आले. त्यांच्यानंतर डेप्युटी कमांडक अमनसिंह जोधा यांनी सूत्रे सांभाळली. म्हैसूर आणि जोधपूरच्या सैनिकांनी दुपारी ३ वाजेपर्यंत तुर्की सैनिकांच्या बहुतांश चौक्या उद्धवस्त केल्या. दुपारी ४ वाजेपर्यंत हायफा तुर्कांच्या तावडीतून स्वतंत्र करण्यात भारतीयांना यश आले. मात्र या लढाईत ९०० सैनिकांचे प्राण गेले. ठाकूर दलपत सिंह यांना मरणोत्तर मिलिटरी क्रॉसने सन्मानित करण्यात आले. तसेच कॅप्टन अनुप सिंह आणि सेकंड लेफ्टनंट सागत सिंह यांनाही मिलिटरी क्रॉस देण्यात आले. कॅप्टन अमनसिंह जोधा आणि दफादार जोरसिंह यांना इंडियन आॅर्डर आॅफ मेरिट पदकाने सन्मानित करण्यात आले. इस्रायलमध्ये आजही २३ सप्टेंबर हायफा दिवस म्हणून साजरा केला जातो व पाठ्यपुस्तकांमध्ये या शौर्यगाथेचा समावेश करण्यात आला आहे. हायफा सिमेट्री या स्मशानभूमीत हे सैनिक चिरनिद्रा घेत आहेत. दिल्लीमध्ये हुतात्म्यांच्या स्मरणार्थ तीन मूर्ती हे स्थळ उभारण्यात आले आता या चौकाचे नाव तीन मूर्ती हायफा चौक असे करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारतभेटीमध्ये तीन मूर्ती येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले होते. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल भेटीमध्ये हायफा सिमेट्रीला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली होती.