‘हायपरथ्रिचोसिस’मुळे चेहऱ्यावर उगवले केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2015 12:23 AM2015-10-04T00:23:24+5:302015-10-04T00:23:24+5:30
‘हायपरथ्रिचोसिस’ या अत्यंत दुर्मिळ रोगामुळे एका इसमाच्या चेहऱ्यावर केस उगवले आहेत. या केसामुळे लज्जित झालेल्या जिजस अॅसेव्हस् या इसमाने प्रारंभी काही वर्षे स्वत:चा
मेक्सिको सिटी : ‘हायपरथ्रिचोसिस’ या अत्यंत दुर्मिळ रोगामुळे एका इसमाच्या चेहऱ्यावर केस उगवले आहेत. या केसामुळे लज्जित झालेल्या जिजस अॅसेव्हस् या इसमाने प्रारंभी काही वर्षे स्वत:चा चेहरा हाताने झाकून जीवन जगण्याचा प्रयत्न केला; पण परिस्थिती अटळ असल्याचे पाहून आता त्याने उजळ माथ्याने जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.
‘हायपरथ्रिचोसिस’ या अतिशय दुर्मिळ विकारामुळे ४१ वर्षीय जिजसच्या चेहऱ्यावर बारीक केस उगवले आहेत. चेहऱ्यावर केस उगवण्याचा हा अपवादात्मक विकार असून, त्याला ‘वेअरवूल्फ सिंड्रोम’ असे संबोधले जाते. या विकारामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर लांडग्याप्रमाणे केस उगवतात. आतापर्यंत असा विकार झालेले संपूर्ण जगात केवळ ५० जण असून, त्यातील १३ जण मेक्सिकोतील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. मेक्सिकोतील झॅकटेक्सास या मध्यवर्ती प्रांतात लोरेटो या शहरात ते राहतात.
या १३ जणांत सात पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. या १३ जणांतच जिजस अॅसेव्हस् याचा समावेश आहे. त्याला ‘चुही’ या टोपणनावानेही ओळखले जाते. चेहऱ्यावरील केसांमुळे समाजात जीवन जगताना त्याला अतिशय कठीण संघर्ष करावा लागला. त्याच्या चेहऱ्यावर बालपणापासून केस असल्याने ‘देवाने आम्हाला इतरांपेक्षा वेगळे का बनवले? मी वेगळा का आहे?’ असा सवाल तो करतो.
‘हायपरथ्रिचोसिस’ हा विकार वांशिक असून, चेहऱ्यावर केस उगवण्याखेरीज त्याचे अन्य कोणतेही परिणाम दिसत नाहीत; पण त्यामुळे रोजगार मिळविण्यात खूप अडचणी येतात. ‘मी इतरांपेक्षा वेगळा असल्याने संधी मिळत नाही; पण मला का संधी नाकारली जाते हे मला अजून समजले नाही, असे अॅसेव्हस् म्हणतो.
त्याने संपूर्ण जीवनपट उलगडून सांगताना कठीण बालपण आणि सर्कसमधील विपरित अनुभव त्याने कथन केले. टीव्हीवरील शोच्या वेळी त्याने दोनदा चेहऱ्यावरील केस कापून टाकले होते. एक शो जपानी आणि दुसरा ब्रिटिश टीव्हीवर झाला होता. चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याचा अनुभवही फारसा चांगला नाही, मलाच माझा चेहरा विचित्र, निळसर रंगाचा दिसत होता, असे तो म्हणाला. त्यामुळे पुन्हा कधी चेहऱ्यावरील केस काढण्याचा विचार मी केला नाही; उलट ठामपणाने जगण्याचा निर्धार केला. (वृत्तसंस्था)
हेटाळणीमुळे बनला मद्यपी!
वर्गातही अन्य मुले त्याची थट्टा करीत असल्याने त्याने शाळा सोडून दिली. ही मुले त्याची हेटाळणी करून चेहऱ्यावरील
केस ओढत असत. त्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षापासून त्याला मद्याची सवय लागली.
त्यानंतर तो मद्यपीच बनला. त्याच्या अन्य दोन भावांचीही हीच अवस्था होती. सर्कसमध्ये काम करताना त्याला दिवसाला ८ डॉलर्स मिळत असत.