हजमध्ये मृत्यूचे तांडव!

By Admin | Published: September 25, 2015 03:35 AM2015-09-25T03:35:13+5:302015-09-25T03:35:27+5:30

पवित्र मक्केपासून जवळच असलेल्या मीना येथे गुरुवारी हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ भाविकांचा मृत्यू झाला असून ८०५ नागरिक जखमी झाले आहेत.

Haj death oranges! | हजमध्ये मृत्यूचे तांडव!

हजमध्ये मृत्यूचे तांडव!

googlenewsNext

पवित्र मक्केपासून जवळच असलेल्या मीना येथे गुरुवारी हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ भाविकांचा मृत्यू झाला असून ८०५ नागरिक जखमी झाले आहेत. सैतानाला दगड मारण्याच्या वेळी (एक धार्मिक प्रथा) गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
मीना शहरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. याच वेळी ही दुर्घटना घडली. भारतातून मक्का येथे दाखल झालेले भाविक हज समितीच्या माध्यमातून येथे आले आहेत. जखमी नागरिक एवढे भयभीत झाले आहेत, की ते अक्षरश: काही बोलूही शकत नाहीत. सुप्रीम हज कमिटीचे अध्यक्ष मोहंमद बिन नायफ यांनी सेक्युरिटी लीडर्सची तातडीने बैठक बोलाविली असून वेगाने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
मृतांत चार भारतीय
मृतांमध्ये एक महिला आणि एका स्वयंसेवकासह चार भारतीयांचा समावेश असून दोन भारतीय जखमी झाले आहेत, असे जेद्दाहस्थित भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मोहंमद (कोडुंगलूर-केरळ) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती केरळच्या ग्रामीण विकास आणि अनिवासी केरळी कल्याणमंत्री के. सी. जोसेफ यांनी थिरुवअनंतपूरम येथे दिली. हैदराबादच्या बीबी जान यांचाही मृतांत समावेश असल्याचे तेलंगणा राज्य हज समितीचे विशेष अधिकारी एस. ए. शुकूर यांनी सांगितले. बीबी जान या पती आणि अन्य दोन नातेवाईकांसोबत २ सप्टेंबर रोजी हज यात्रेला गेल्या होता. त्यांचा मीना येथील इस्पितळात मृत्यू झाला. आसाममधील दोन जण जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

एकाच रस्त्यावर भाविक अडकले
या दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका अरुंद जागी ही दुर्घटना झाली. काही भाविक सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी एका रस्त्याने जात होते, तर ही प्रथा पूर्ण करून आलेले भाविक याच रस्त्याने परत येत होते. त्यामुळे रस्ता बंद होऊन ही चेंगराचेंगरी झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.
...अन् चेंगराचेंगरी झाली
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दुसरा एक अंदाज वर्तविला जात आहे की, सुरक्षारक्षक भाविकांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढे न जाण्याविषयी विनंती करत होते; पण भाविक न थांबता या रस्त्याने पुढे जाऊ लागले आणि चेंगराचेंगरी झाली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
सर्वांत मोठ्या हजच्या धार्मिक यात्रेत झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी टिष्ट्वटरवर शोकसंदेश टाकून मृतांविषयी सांत्वना व जखमींसाठी प्रार्थना केली.

भारताचे महावाणिज्य दूत बी. एस. मुबारक हे दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी होते. जखमींमध्ये काही भारतीयांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय भाविक हे अल अरब आणि अल जवाहरा या रस्त्याने जात होते, तर दुर्घटना अन्य रस्त्यावर झाल्याने जखमींमध्ये जास्त भारतीय नाहीत असे ते म्हणाले.
हजसाठी भारतातून एक लाख चाळीस हजार भाविक पवित्र मक्का येथे दाखल झाले आहेत.
जखमींना मीना आणि अन्य शहरातील हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये सर्वाधिक आफ्रिकन आणि सौदी अरबमधील भाविकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत ७१७ भाविक मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला सौदीच्या प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच क्रेन दुर्घटनेत १०७ भाविक मृत्युमुखी पडले होते. २००६ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत येथे ३०० भाविक मृत्युमुखी पडले.
जगभरातून वीस लाखांहून अधिक भाविक दरवर्षी हज यात्रेसाठी येथे दाखल होतात. जखमींच्या मदतीसाठी ४००० नागरिक तैनात, तर सेवेला २०० अ‍ॅम्ब्युलन्स.

हज यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटना
मृतजखमी
2 जुलै 1990 पदपथावर सुरुंगस्फोट 1426
23 मे 1994 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 270
9 एप्रिल 1998 जमारात पूल दुर्घटना 118 180
5 मार्च 2001 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 35
11 फेब्रुवारी 2003 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 14
1 फेब्रुवारी 2004 सैतानाला दगड मारण्याची परंपरा, मीना 251244
12 जानेवारी 2006 सैतानाला दगड मारण्याची परंपरा, मीना 346 289

Web Title: Haj death oranges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.