हज यात्रेला आज प्रारंभ, दीड लाख भारतीयांचा सहभाग
By admin | Published: September 21, 2015 11:36 PM2015-09-21T23:36:49+5:302015-09-21T23:36:49+5:30
मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या हज यात्रेला मंगळवारी प्रारंभ होत आहे. जगभरातून आलेल्या लाखो मुस्लिमांसह दीड लाखांहून अधिक भारतीय यात्रेकरूही इस्लामचे सर्वात
मक्का : मुस्लिम धर्मीयांच्या सर्वात मोठ्या हज यात्रेला मंगळवारी प्रारंभ होत आहे. जगभरातून आलेल्या लाखो मुस्लिमांसह दीड लाखांहून अधिक भारतीय यात्रेकरूही इस्लामचे सर्वात पवित्रस्थळ मक्का येथून मीना खोऱ्याकडे रवाना होतील.
सोमवारी सूर्यास्तानंतर इस्लामिक हिजरी दिनदर्शिकेचा अखेरचा महिना धुल हिज्जाहची आठ तारीख उजाडेल आणि इस्लामला मानणारे सर्व यात्रेकरू मोठ्या संख्येने मीनाकडे रवाना होतील. हा पायी प्रवास पाच किलोमीटरचा असेल. सकाळी यात्रेकरूंच्या प्रचंड गर्दीला टाळण्यासाठी अनेक यात्रेकरू रात्री उशिराच मीनाकडे रवाना होतील.
पाच दिवसांच्या हज यात्रेची सैतानाला दगड मारण्याच्या विधीने शनिवारी सांगता होईल. सौदी अरेबिया प्रशासनाने हज यात्रेकरूंसाठी मीना येथे व्यापक व्यवस्था केली आहे. या शहरात हजारो तंबू अल्लाहच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. हज यात्रेकरूंना सर्व सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश दोन प्रमुख मशिदींचे संरक्षक सुलतान सलमान बिन अब्दुल अजीज यांनी संबंधितांना दिले आहेत. (वृत्तसंस्था)
विविध देशांतून रविवारपर्यंत १५ लाख यात्रेकरू पोहोचले असून शेजारील देशांतून आणखी काही येऊ शकतात, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. सौदी प्रशासनाने हज यात्रेकरूं ची सुरक्षा आणि सुविधेसाठी एक लाख सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.