‘हज’साठी सौदी अरेबियात गेलेल्या यात्रेकरूंचा का झाला मृत्यू? कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 05:22 PM2024-06-23T17:22:56+5:302024-06-23T17:24:49+5:30
Haj Yatra: सौदी अरेबियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार हज यात्रेदरम्यान बहुतांश यात्रेकरूंचा येथील भयंकर गरमीमुळे मृत्यू झाला. हज यात्रेदरम्यान, यात्रेकरूंना ५१ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. त्यात मागच्या आठवड्यात मक्का येथे ५१.८ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली होती.
सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी गेलेल्या शेकडो यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. १४ जून रोजी हज यात्रेला सुरुवात झाल्यापासून या यात्रेदरम्यान, कडक उन्हाचा त्रास झालेल्या यात्रेकरूंचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत होते. त्यात अनेक यात्रेकरू रस्त्याच्या शेजारी व्हिलचेअरवर पडलेले दिसत होते. अनेक छायाचित्रांमधून यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं दिसत होतं. दरम्यान, हज यात्रेदरम्यान सुरू झालेल्या यात्रेकरूंबाबतच्या या अफवा यात्रा संपल्यानंतर खऱ्या असल्याचे समोर आले. तसेच हज यात्रेदरम्यान, एक हजारांहून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली.
सौदी अरेबियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार हज यात्रेदरम्यान बहुतांश यात्रेकरूंचा येथील भयंकर गरमीमुळे मृत्यू झाला. हज यात्रेदरम्यान, यात्रेकरूंना ५१ डिग्री सेल्सियसहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. त्यात मागच्या आठवड्यात मक्का येथे ५१.८ डिग्री एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. याबाबत सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, उकाड्यामुळे थकवा आल्याच्या २७०० घटनांची नोंद झाली आहे. मात्र हा अहवाल मृत्यूचे आकडे समोर येण्यापूर्वीचा आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हज यात्रेदरम्यान, मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजारांहून अधिक झाली आहे. मृत्यू झालेल्या हज यात्रेकरूंमध्ये इजिप्त, इंडोनेशिया, सेनेगल, जॉर्डन, इराण, इराक, भारत आणि ट्युनिशिया या देशांमधील हज यात्रेकरूंचा समावेश आहे. इजिप्तमधील सर्वाधिक ३०० यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर इंडोनेशियामधील १४० आणि भारतातील ९८ यात्रेकरूंचा सौदी अरेबियातील भयानक उष्म्यामुळे मृत्यू झाला.
मागच्या काही वर्षांपासून हज यात्रेदरम्यान, सौदी अरेबियाकडून मिस्टिंग स्टेशन आणि डिस्पेंसरसारख्या सुविधा पुरवून उकाड्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तरीही भयंकर उकाडा आणि अधिक वयामुळे बहुतांश हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. हज यात्रेला आलेले बहुताश यात्रेकरू वयस्कर होते, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंसाठी कुणाला जबाबदार धरायचं यावरून सौदी अरेबियामध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे.