दहशतवाद्यांना अर्धनग्न करून काढली परेड; इस्रायल-हमास युद्धात १७ हजार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 09:10 AM2023-12-09T09:10:49+5:302023-12-09T09:11:04+5:30
हे आत्मसमर्पण जाबेलिया भागात झाले आहे.या युद्धात आतापर्यंत हजारो बालकांचा बळी गेला आहे.
राफा : इस्रायली सैन्याने गाझामध्ये शेकडो पॅलेस्टिनींना ओलीस ठेवले आहे. इस्रायल त्यांना हमासचे दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे. ते अर्धनग्न अवस्थेत असून, त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. त्यांची नुकतीच अर्धनग्न परेड काढून त्यांना लष्कराच्या ट्रकमधून इतर ठिकाणी नेण्यात आले. ज्या हमासच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे त्यांची नेमकी संख्या समोर आलेली नाही. हे आत्मसमर्पण जाबेलिया भागात झाले आहे.या युद्धात आतापर्यंत हजारो बालकांचा बळी गेला आहे.
...तर बेरूतला उद्ध्वस्त करू : नेतन्याहू
लेबनॉनमधून इस्रायलवरील हल्ले तीव्र झाले आहेत. हिजबुल्लाहने पुन्हा इस्रायलच्या हद्दीत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला धमकी दिली. ते म्हणाले की, लेबनॉनकडून होणारे हल्ले थांबले नाहीत तर इस्त्रायली सैन्य गाझाप्रमाणे राजधानी बेरूतला उद्ध्वस्त करेल.
माजी लष्करप्रमुखाच्या मुलाचा मृत्यू
गाझामध्ये मास्टर सार्जंट गॅल मीर इसेनकोट मारला गेला. तो इस्रायलचे वॉर कॅबिनेट मंत्री गादी इसेनकोट यांचा मुलगा होता. इसेनकोट माजी लष्करप्रमुख होते.