Languages : जगातील निम्म्या भाषा नष्ट होण्याचा गंभीर धोका, एका अभ्यासातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:50 AM2023-04-22T06:50:13+5:302023-04-22T06:50:35+5:30
Languages : जगात अस्तित्वात असलेल्या हजारो भाषांपैकी निम्म्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून काढला आहे.
कॅनबरा : जगात अस्तित्वात असलेल्या हजारो भाषांपैकी निम्म्या भाषांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून काढला आहे. प्रचलित असलेल्या अनेक भाषा लहान मुलांना शिकविल्या जात नसल्याने त्यांचे ज्ञान भावी पिढ्यांना होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्या भाषा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र हे संकट टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी ग्रामबँक ही डेटाबेस प्रणाली तयार केली आहे.
या अभ्यासात सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील संशोधक हेडविग स्किरगार्ड, युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंडमधील प्रा. सायमन ग्रीनहिल यांनी सायन्स ॲडव्हान्स या नियतकालिकात एक लेख लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, जगात सात हजार भाषा अस्तित्वात असून त्यातील २४००हून अधिक भाषांचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी ग्रामबँक नावाने विविध भाषांच्या व्याकरणाचा एक व्यापक डेटाबेस तयार केला आहे.
कोणत्याही भाषेत व्याकरणामुळे वाक्यांची व्यवस्थित रचना करता येते. त्यामुळे ग्रामबँक बनविताना व्याकरणाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. हजारो भाषांची परस्परांशी तुलना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९५ प्रश्न तयार केले व त्यांची उत्तरे शोधून ती ग्रामबँकेत समाविष्ट केली आहेत. (वृत्तसंस्था)
द. अमेरिका, ऑस्ट्रेलियातील स्थानिक भाषांवर संकट
- शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जगामध्ये इंग्रजीसह काही भाषेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र प्रत्येक देशातील काही भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न भावी काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी ज्या भाषा नष्ट झाल्या, त्यात लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ उकलणे खूप कठीण झाले आहे.
- द. अमेरिका, ऑस्ट्रेलियातील स्थानिक लोकांच्या भाषांचा वापर कमी होत चालल्याने त्या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत.
भाषा टिकविण्यास हवेत ठोस प्रयत्न
- शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांनी २०२२ ते २०३२ हे स्वदेशी भाषांचे दशक म्हणून जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने जगात अस्तित्वात असलेल्या सात हजार भाषांपैकी प्रत्येक भाषा टिकून राहावी यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- ही भाषा भावी पिढ्यांना अभ्यासक्रमात शिकविली जायला हवी, त्या भाषेत संभाषण, लेखन होणे आवश्यक आहे. त्या भाषेचे व्याकरण मुलांना नीट समजावून दिले पाहिजे.