दक्षिण कोरियात हॅलोवीन पार्टीमध्ये चेंगराचेंगरी, १२० जणांचा मृत्यू, १५० जखमी, अनेकांना हार्ट अॅटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:54 PM2022-10-29T23:54:54+5:302022-10-29T23:59:45+5:30
South Korea News: दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथील एका मुख्य बाजारामध्ये शनिवारी हॅलोविन पार्टीमध्ये भीषण चेंगराचेंगरी होऊन सुमारे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
सोल - दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथील एका मुख्य बाजारामध्ये शनिवारी हॅलोविन पार्टीमध्ये भीषण चेंगराचेंगरी होऊन सुमारे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच या चेंगराचेंगरीदरम्यान, अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलच्या मुख्य पार्टी केंद्र असलेल्या हॅमिल्टन हॉटेलच्या दिशेने जात असलेल्या लोकांची गर्दी एका चिंचोळ्या गल्लीत घुसली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इटावोनच्या रस्त्यांवर अनेक लोकांना सीपीआर दिला जात आहे. तर अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील अनेकांना हृदय विकाराचा झटका आला आहे. त्यांची संख्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली नाही.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी त्वरित आपत्ती निवारण पथकाला रवाना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना जखमींवरील उपचार त्वरित सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
द कोरिया हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार मेगासिटीमधील केंद्रीय जिल्हा इटावोनच्या अत्यंत चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये शनिवारी रात्री सुमारे लाखभर लोकांची गर्दी जमली होती. यादरम्यान, मध्यरात्रीपूर्वी एका हॉटेलजवळ चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यात शेकडो लोक जखमी झाले.
या दुर्घटनेसंबंधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.