इस्माईल हानियाच्या खोलीत ठेवला होता रिमोट बॉम्ब, दोन महिन्यांपासून सुरू होते प्लॅनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:40 PM2024-08-02T15:40:47+5:302024-08-02T15:42:09+5:30
Ismail Haniyeh Death : रिपोर्टमध्ये काही इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, तेहरानमध्ये इस्माईल हानियाची हत्या ही इराणी लष्करासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे.
हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या मृत्यूबाबत नवा खुलासा समोर आला आहे. ज्यामध्ये हानियाची हत्या कशी करण्यात आली हे सांगण्यात आले आहे. दरम्यान, इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हमास प्रमुख इस्माईल हानिया हा इराणची राजधानी तेहरान येथे गेला होता. त्यावेळी इराणी लष्कर आयआरजीसीच्या गेस्ट हाऊसमध्ये हानियाची हत्या करण्यात आली होती. तर ज्या बॉम्बने हानियाची हत्या करण्यात आली, तो बॉम्ब दोन महिन्यांपूर्वी तेहरानमध्ये तस्करी करून ठेवण्यात आला होता, असा खुलासा समोर आले आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, इस्माईल हानियाच्या हत्येसाठी रिमोट कंट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आला होता. हा बॉम्ब दोन महिन्यांपूर्वी तस्करी करून तेहरानमधील इस्माईल हानिया ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होता, त्याच गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आला होता. इराण लष्कर आयआरजीसी आणि अनेक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये ही माहिती शेअर करण्यात आली आहे. हा नवीन खुलासा सुरुवातीच्या दाव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, ज्यात इस्माईल हानियाचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला होता.
रिपोर्टमध्ये काही इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, तेहरानमध्ये इस्माईल हानियाची हत्या ही इराणी लष्करासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. कारण, इस्माईल हानिया आणि अनेक नेते ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते, ते आयआरजीसी चालवते. इस्माईल हानिया तेहरान येथील नेशहत नावाच्या आरआयजीसी कंपाउंडमध्ये राहिला होता. या कंपाऊंडचा वापर गुप्त बैठका आणि हाय प्रोफाईल गेस्टसाठी केला जात होता.
आयआरजीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्माईल हानियाचा मृत्यू बॉम्बस्फोटात झाला, हा बॉम्ब रिमोट कंट्रोल्ड होता. बॉम्बचा स्फोट होताच गेस्ट हाऊसची कंपाऊंड भिंत कोसळली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. सध्या या बॉम्बस्फोटामुळे इस्माईल हानियाच्या शेजारील खोलीचे फारसे नुकसान झालेले नाही. तर पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादचा नेता झियाद नखलेह शेजारच्या खोलीत थांबला होता. या स्फोटाने इस्माईल हानियाची हत्या फुलप्रूफ प्लॅनिंगनुसार झाल्याची पुष्टी झाली आहे.
स्थानिक वेळेनुसार पहाटे दोनच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच, घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. इस्माईल हानिया आणि त्याच्या गार्डला जागीच मृत घोषित करण्यात आले. माहिती मिळताच हमासचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी इस्माईल हानियाचा मृतदेह पाहिला. या घटनेनंतर कुद्स फोर्स कमांडर इस्माइल गनी यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना इस्माईल हानियाच्या मृत्यूची माहिती दिली.