हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:24 AM2023-10-22T05:24:40+5:302023-10-22T05:26:51+5:30
हमासने केलेल्या हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे.
वॉशिंग्टन: सौदी अरेबिया व इस्रायलमध्ये शांतता करार होण्याची शक्यता वाटल्यामुळेच हमासने इस्रायलवर भीषण हल्ला केला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. त्याबाबतची संभाव्य चर्चा उधळून लावण्यासाठी हमासने सारे कारस्थान रचले, असा आरोपही त्यांनी केला.
पॅलेस्टाइनमधील नागरिकांना आणखी अधिकार मिळावेत तसेच त्यांची सुरक्षितता धोक्यात येता कामा नये, अशा अटी सौदी अरेबियाने इस्रायलला घातल्या होत्या. त्या पाळण्यास होकार दर्शविल्यास इस्रालयबरोबर शांतता करार करण्याची सौदी अरेबियाने तयारी दर्शविली होती, मात्र हमासने केलेल्या हल्ल्यानंतर शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे म्हटले जात आहे.
हमासकडे २०० लोक ओलीस
हमासने २०० लोकांना ओलीस ठेवले असून, त्यातील या दोघींची सर्वप्रथम मुक्तता करण्यात आली. हमासच्या तावडीत सापडलेल्या सर्व अमेरिकी नागरिकांची सुटका व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले. ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली यांना इस्रायलमार्गे लवकरच अमेरिकेला पाठविण्यात येणार आहे. आणखी दहा अमेरिकी नागरिक हमासच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकी महिलांची मुक्तता
हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली रनन या दोन अमेरिकी महिलांची सुटका केली. या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ले केले होते. तेव्हा या दोघी हमासच्या तावडीत सापडल्या होत्या. त्यांची सुटका झाल्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोघींशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तुम्ही संकटाला धाडसाने तोंड दिल्याबद्दल बायडेन यांनी त्यांचे कौतुक केले.
अनेक देशांत इस्रायलविरोधात निदर्शने
- गाझा येथे इस्रायलने केलेल्या भीषण बॉम्बहल्ल्यांचा निषेध करण्यासाठी ब्रिटनमध्ये लंडन व अन्य शहरांत पॅलेस्टाइनच्या समर्थकांनी शनिवारी मोर्चे काढले.
- लंडनमधील हाइड पार्क येथे हे मोर्चेकरी जमा झाले होते. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे इस्रालयविरोधात शनिवारी मोर्चा काढला.
- त्याशिवाय इजिप्त, लेबनॉन, तुर्कस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, आदी देशांमध्येही पॅलेस्टिनी समर्थकांनी उग्र निदर्शने केली.
- गाझावर इस्रायलने सुरू केलेले हल्ले त्वरित थांबविण्यात यावेत, अशी मागणी या निदर्शकांनी केली आहे.