उडणारे कंडोम काढताहेत इस्रायलचा दम; आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांमुळे चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:35 PM2021-06-16T15:35:19+5:302021-06-16T15:38:18+5:30
हमासकडून हल्ल्यांसाठी कंडोम आणि फुग्यांचा वापर; प्रत्युत्तरादाखल इस्रायलचा एअर स्ट्राईक
तेलअवीव: इस्रायलमधील १२ वर्षांच्या नेतन्याहू शासन पर्वाचा अंत होऊन यामिना पक्षाचे ४९ वर्षीय नेते नफ्ताली बेनेट पंतप्रधान झाले. मात्र इस्रायलच्या आक्रमक भूमिकेत बदल झालेला नाही. पॅलेस्टाईन विरुद्ध सुरू असलेला संघर्ष सुरुच आहे. इस्रायलनं पुन्हा एकदा गाजावर एअरस्ट्राईक केला आहे. वृत्तसंस्था एएफपीनं याबद्दलची माहिती दिली आहे.
गाझावर एअरस्ट्राईक झाल्याचं वृत्त एएफपीनं पॅलेस्टिनी सुरक्षा दलांच्या हवाल्यानं दिलं आहे. बुधवारी सकाळी पॅलेस्टिनींकडून दक्षिण इस्रायलच्या दिशेनं पेट घेऊ शकणारे फुगे आणि कंडोम सोडण्यात आले. याच कंडोम आणि फुग्यांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला. हमास या दहशतवादी संघटनेनं कंडोम आणि फुगे सोडल्यानंतर इस्रायलनं थेट गाझावर एअर स्ट्राईक केला.
कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या फुग्यांचा वापर पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी केला जात आहे. याशिवाय कंडोमच्या मदतीनंदेखील हल्ले केले जात आहेत. दहशतवादी संघटना हमास इस्रायलचं नुकसान करण्यासाठी फुगे आणि कंडोमचा वापर करत आहे. या माध्यमातून इस्रायलमधील नागरिकांच्या संपत्ती, शेती, बगिचे यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
दहशतवादी हल्ले करण्यासाठी कंडोम आणि फुगे फुगवताना हायड्रोजन किंवा हेलियमचा वापर करतात. या फुग्यांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल लावण्यात येतं. वाऱ्याची दिशा पाहून फुगे हवेत सोडले जातात. जिथे हे फुगे पडतात, तिथे स्फोट होऊन आग लागते. फुग्यांचा बॉम्ब म्हणून वापरण्याचं तंत्र जुनं आहे. १८४९ मध्ये ऑस्ट्रियानं सर्वप्रथम ही पद्धत वापरलं होतं.
शस्त्रसंधी मोडीत काढत इस्राइलयाचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक; उंच इमारती लक्ष्य, मोठं नुकसान
दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाविरोधात या तंत्राचा वापर केला होता. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या बहिणीचे फोटो असलेले फुगे दक्षिण कोरियाकडून आकाशात सोडले जात होते. त्यामुळे संतापलेल्या किमनं दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.