भयावह! गाझातील रुग्णालयात अक्षरश: सडतायत मृतदेह, एकाच वेळी 179 शव करावे लागले दफन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:14 PM2023-11-14T20:14:22+5:302023-11-14T20:15:20+5:30
अबू सल्मियाह म्हणाले, “त्यांना सामूहिक कबरीत दफन करणे आम्हाला भाग पाडले. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह विखुरलेले असून शवागारात वीज नाही. 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत कोणतेही इंधन पोहोचलेले नाही."
हमासने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, इस्रायलनेही प्रत्यूत्तरात हमास विरोधात युद्ध पुकारले आहे. सुरुवातीला हवाई हल्ले केल्यानतंर आता इस्रायली सैन्याने गाझात प्रवेश केला आहे. यादरम्यान इस्रायली सैन्याची हमासच्या दहशतवाद्यांसोबत जबरदस्त चकमक झाली आहे. याच वेळी गाझातील सर्वात मोठ्या अल शिफा रुग्णालयाचा पाणी पुरवठा, वीज आणि ऑक्सिजनचा पुरवठाही बंद झाला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या अनेकांचा जीवही धोक्यात आला आहे.
यासंदर्भात बोलताना अल शिफा रुग्णालयाचे (Al-Shifa Hospital Gaza) डायरेक्टर मोहम्मद अबू सल्मियाह सोमवारी म्हणाले, अतिदक्षता विभागात मरण पावलेल्या बालक आणि रूग्णांसह 179 जणांना परिसरात "सामूहिक कबरी"मध्ये दफन करण्यात आले. रुग्णालयात इंधनाचा पुरवठा संपल्यानंतर, 7 मुलांसह अतिदक्षता विभागातील 29 रुग्णांना दफन करण्यात आले आहे.
अबू सल्मियाह म्हणाले, “त्यांना सामूहिक कबरीत दफन करणे आम्हाला भाग पाडले. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह विखुरलेले असून शवागारात वीज नाही. 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीत कोणतेही इंधन पोहोचलेले नाही."
एएफपी या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने रुग्णालयाचे संचालक म्हणाले, सडलेल्या मृतदेहांची दुर्गंधी सर्वत्र पसरत आहे. सोमवार आणि मंगळवारच्या रात्री हवाई हल्ले गेल्या काही दिवसांच्या तुलनेत फार कमी होते. यामुळे आम्हाला मृतदेहांना दफन करणे शक्य झाले. इस्रायली सैनिकांच्या रणगाड्यांनी गाझातील अल-शिफा रुग्णालयाला चारही बाजूंनी वेढले होते. रुग्णालयात हमासचे भूमिगत कमांड क्षेत्र असल्याचा तेल अवीवचा आरोप आहे. मात्र, दहशतवादी गटाने नेहमीच याचा इनकार केला आहे.