हमासनं आपल्याच ‘सैनिकांचा’ घेतला प्राण; हे सारे कितीही मोठे लढवय्ये असले तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 07:38 IST2025-02-11T07:37:52+5:302025-02-11T07:38:18+5:30
हमासच्या ताब्यात असलेल्या या पुरुष ओलिसांवर हमासच्या समलैंगिक योद्ध्यांनी शारीरिक अत्याचार केले होते.

हमासनं आपल्याच ‘सैनिकांचा’ घेतला प्राण; हे सारे कितीही मोठे लढवय्ये असले तरीही...
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी तडकाफडकी जे अनेक निर्णय घेतले, त्यात एक मोठा निर्णय होता, तो म्हणजे अमेरिकेत आता फक्त दोनच ‘जेंडर’ असतील.. स्त्री आणि पुरुष! ‘थर्ड जेंडर’ असला काही प्रकार आमच्या देशात चालणार नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे एलजीबीटीक्यू समुदायाची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात मागे फेकली गेली आणि या चळवळीला मोठा धक्का बसला.
अलीकडच्या काळात हळूहळू का होईना, या समुदायाला जगात अनेक ठिकाणी मान्यता मिळू लागली आहे. त्यांना अगदीच पूर्णपणे स्वीकारलं जात नसलं तरी किमान ‘माणूस’ म्हणून वागणूक दिली जातेय. मात्र जगातील सर्वाधिक प्रगत देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत असा निर्णय घेण्यात आल्यामुळे या समुदायाला आपला लढा आता पुन्हा नव्यानं सुरू करावा लागेल. अमेरिकेनं असा निर्णय घेतल्यामुळे इतर देशही एलजीबीटीक्यू समुदायाला मान्यता देण्यास कचरतील, असा चळवळीतील कार्यकर्त्यांचा कयास आहे.
दुसरीकडे काही समाज आणि गटांचा तर ‘थर्ड जेंडर’ला कायमच विरोध राहिला आहे. त्यांच्या दृष्टीनं या समुदायाला जगण्याचाच अधिकार नाही. समलिंगी व्यक्ती म्हणजे तर त्यांच्या दृष्टीनं समाजाला लागलेली कीडच आहे. त्याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे हमास. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा केवळ त्या देशांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला फटका बसला होता. या युद्धात हमासचेही अनेक अतिरेकी कामी आले. या युद्धामुळे आपल्या संघटनेत नवीन ‘सैन्याची’ भरती करण्याचे आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या हमासनं प्रत्यक्ष युद्ध सुरू असताना आपल्याच अनेक सैनिकांना आपल्याच हातानं गोळ्या घातल्या!
खुद्द इस्रायलच्या सैन्यालाच या संदर्भात गाझा पट्टीत काही अधिकृत कागदपत्रं आढळून आली. का मारण्यात आलं या योद्ध्यांना? - कारण हमासचे हे सारे साथीदार समलैंगिक होते! हमासच्या दृष्टीनं हे सारे कितीही मोठे लढवय्ये असले तरीही ‘नैतिकतेच्या’ पातळीवर ते कुचकामी होते. त्यांच्यावर समलैंगिकता, समलैंगिक चर्चा, महिलांची छेडखानी, अनैसर्गिक संबंध, याशिवाय इस्रायलच्या पुरुष बंधकांवर शारीरिक अत्याचार केल्याचे आरोप होते. या साऱ्यांना नंतर गोळ्या घालण्यात आल्या. गाझामध्ये मुळातच समलैंगिक संबंधांना बंदी आहे. त्यामुळे हमासच्या या योद्ध्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. याच कारणावरून २०१६ मध्ये हमासच्या कमांडरलाही हमासनंच ठार मारलं होतं!..
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार २०२३मध्ये हमासनं इस्त्रायलच्या काही सैनिकांना आणि नागरिकांना आलिस ठेवलं होतं. हमासच्या ताब्यात असलेल्या या पुरुष ओलिसांवर हमासच्या समलैंगिक योद्ध्यांनी शारीरिक अत्याचार केले होते. इस्त्रायलचे सैनिक हमासच्या दृष्टीनं शत्रू असले तरीही आपल्या लोकांनी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणं हमासला बिलकूल पसंद नव्हतं. त्याऐवजी त्यांनी या ओलिसांना इतर कुठला त्रास दिला असता, त्यांचा छळ केला असता, तरीही ते खपवून घेतलं असतं, पण ही गोष्ट त्यांच्यासाठी घोर पातक होतं. त्यामुळेच त्यांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. हमासनं आपल्या किती योद्ध्यांना ठार मारलं, हे मात्र अद्याप उजेडात आलेलं नाही.