ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 03:04 IST2025-02-11T03:03:04+5:302025-02-11T03:04:21+5:30
...आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला
इस्रायल आणि हमास यांच्यात दीड वर्षे युद्ध चालले. पॅलेस्टाइनमध्ये प्रचंड विध्वंस झाला. यानंतरच्या युद्धबंदीमुळे गाझावासीयांना काही प्रमाणात निश्चितच दिलासा मिळाला. मात्र, त्यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत नाहीत. युद्धबंदीअंतर्गत कैदी आणि ओलीसांची अदलाबदली केली जात असतानाच, आता आपण इस्रायली ओलिसांना मुक्त करणार नाही, असे म्हणत हमासने सोमवारी अचानक पलटी मारली. यानंतर, आता इस्रायलही संतापला असून, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला गाझामध्ये मोठी कारवाई करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
आपण पुढील आदेशापर्यंत इस्राइली ओलिसांना मुक्त करणार नाही, अशी घोषणा दहशतवादी संघटना हमासने केली आहे. इस्रायलने युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर, इस्रायल भडकला असून, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल काट्झ म्हणाले, हमासनेच युद्धविरामाचे उल्लंघन केले. तसेच आपण गाझामध्ये इस्रायली समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सैन्याला तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहेत हमासचे आरोप -
हमासचा सैन्य विंगचा प्रवक्ता अबू उबैदाने आरोप केला आहे की, 19 जानेवारीपासून युद्धविराम लागू असूनही इस्रायलने उत्तर गाझातील विस्थापितांच्या परतीच्या प्रवासात अडथळा आणला, गाझामध्ये हल्ले केले आणि मदत साहित्याचा पुरवठा थांबवला. खरे तर, गेल्या तीन आठवड्यांपासून युद्धबंदी बऱ्यापैकी कायम आहे. मात्र असे असले तरी, इस्रायली गोळीबारात पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना ही घडल्या आहेत.
अबू उबैदा पुढे म्हणाला, जोवर इस्रायल त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही आणि गेल्या आठवड्यांची भरपाई करत नाही, तोवर हमास आणखी कोणत्याही ओलिसाला सोडणार नाही. शनिवारी इस्रायली ओलीस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची आणखी एक अदलाबदल नियोजित होती.