मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:47 AM2024-06-14T06:47:39+5:302024-06-14T06:49:12+5:30
Pakistan Court: न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती.
लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात तेथील लष्करी वास्तूंवर हल्ले केले होते. त्या प्रकरणांच्या खटल्यांचा आपल्याला अनुकूल असा निकाल द्यावा म्हणून गुप्तचर संस्था आयएसआय माझा व कुटुंबीयांचा छळ करीत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायाधीशानेच केली आहे.
या न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांनी लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मलिक शहजाद अहमद खान यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या विरोधातील खटल्यांची सुनावणी न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांच्यासमोर होत आहे. गेल्या आठवड्यात यापैकी एका प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर झाली. त्या सुमारास आयएसआयच्या गुप्तचर यंत्रणेने न्या. अब्बास यांना काही काळ ओलीस ठेवले होते. तसे या न्यायाधीशांनी पत्रात म्हटले आहे.
न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती. (वृत्तसंस्था)
‘यंत्रणांचा हस्तक्षेप बंद व्हायला हवा’
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात खटल्यांचे निकाल द्यावेत, अशी आयएसआयची इच्छा आहे. गुप्तचर यंत्रणांचा न्यायालयीन यंत्रणेतील हस्तक्षेप कमी व्हावा म्हणून काय उपाययोजना करता येईल याचा तपशील पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांकडून मागविला होता.
दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद अब्बास यांनी केलेल्या तक्रारीनंतर लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अहमद खान यांनी पंजाबचे पोलिस महासंचालक डॉ. उस्मान अन्वर यांना समन्स जारी केले आहेत.