भारतीय वंशाचे हरजित सज्जान कॅनडाच्या संरक्षणमंत्रीपदी
By admin | Published: November 5, 2015 12:25 PM2015-11-05T12:25:14+5:302015-11-05T12:25:14+5:30
कॅनडातील नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रुडी यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशांच्या खासदारांची वर्णी लागली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ओटावा, दि. ५ - कॅनडातील नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रुडी यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशांच्या खासदारांची वर्णी लागली आहे. विशेष बाब म्हणजे कॅनडातील संरक्षण खात्यासारख्या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार भारतीय वंशाचे हरजित सज्जान यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
कॅनडात ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल पार्टीचे जस्टिन ट्रुडी यांनी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा धुव्वा उडवत बाजी मारली होती. गुरुवारी ४३ वर्षीय ट्रुडी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून ट्रुडी यांच्या तीस जणांच्या मंत्रिमंडळात शीख समाजातील तिघा खासदारांची वर्णी लागली आहे. ४२ वर्षीय हरजित सज्जान हे बॅंकुवर येथून खासदार म्हणून निवडून आले असून ते निवृत्त जवान आहेत. त्यांनी बोस्निया आणि अफगाणिस्तानमधील कंदहार येथे कॅनडातील सैन्यासाठी काम केले आहे. सज्जान यांचा जन्म भारतात झाला असून ते ५ वर्षांचे असताना त्यांचे आईवडिल कॅनडात स्थायिक झाले होते.
भारतीय वंशांचे नवदीप बेन्स यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ३८ वर्षीय बेन्स यांच्याकडे आर्थिक विकास व विज्ञान हे खाते सोपवण्यात आले आहे. तर अमरजीत सोही यांच्याकडे पायाभूत सुविधा मंत्रालय सोपवण्यात आले आहे. कॅनडात पगडी घातलेल्या शीख खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याचे चित्र बघून कॅनडातील शीख समाजात आनंदाचे वातावरण होते.