संघर्षादरम्यान Israel च्या पंतप्रधानांची कठोर भूमिका; म्हणाले, "कारवाई तोवर सुरू राहणार जोवर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 04:14 PM2021-05-16T16:14:35+5:302021-05-16T16:19:40+5:30
Israel - लोकांचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न : बेंजामिन नेतन्याहू
सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या वाद (Israel-Palestine conflict) अजून चिघळत चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हमास (Hamas) जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. "जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत गाझामध्ये हल्ले सुरूच राहतील आणि लोकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी इस्रायल पूर्ण प्रयत्न करेल," असंही त्यांनी शनिवारी स्पष्ट केलं.
"या संघर्षासाठी जे जबाबदार आहे तो इस्रायल नाही. यासाठी ते जबाबदार आहेत ज्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही कारवाईच्या मध्यात आहोत. कारवाई अद्याप संपली नाही. जोपर्यंत गरज असेल तोवर ही कारवाई सुरूच राहिल," असंही नेतन्याहू यांनी माध्यमावर बोलताना सांगितलं. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
"हमास जाणूनबुजून सामान्य लोकांच्या मागे लपून त्यांना नुकसान पोहोचवण्याची भूमिका बाळगतो. आम्ही सामान्य लोकांना कोणतंही नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इस्रायलकडून एअरस्ट्राईक
इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग खाली करण्याचा इशारा दिला होता. याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. "इस्त्रायली सैन्याने गाझामधील एपीच्या ब्युरो आणि अन्य मीडियाच्या बिल्डिंगला लक्ष्य केले. त्यामुळे मोठा धक्का बसला असून भीतीचे वातावरण आहे," असं असोसिएट प्रेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी प्रुइट यांनी एका निवेदनात म्हटलं. तर अल जजीरा जेरुसलेमचे रिपोर्टर हॅरी फॉसेट म्हणाले की, "आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय वैयक्तिक क्षण आहे. हा विचार करा की, आता ती जागी नाही आहे, विचार करण्यासाठी विलक्षण आहे."