ट्रम्प प्रशासनाविरुद्ध हार्वर्ड आणि एमआयटीने दाखल केला खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 02:36 AM2020-07-12T02:36:13+5:302020-07-12T06:31:27+5:30
हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख लॉरेन्स एस. बॅकाऊ म्हणाले की, कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. बोस्टनच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून, या आदेशाविरुद्ध स्थगितीची मागणी करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन : कोरोना संकटाच्या काळात अमेरिकेत विदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा न देण्याच्या अमेरिका सरकारविरुद्ध येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी हार्वर्ड आणि एमआयटीने या निर्णयावर आक्षेप घेत ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे.
हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख लॉरेन्स एस. बॅकाऊ म्हणाले की, कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. बोस्टनच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून, या आदेशाविरुद्ध स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. अमेरिका सरकारच्या या निर्णयाने भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, या दोन शैक्षणिक संस्थांनी आवाज उठविल्यानंतर आता अन्य विद्यापीठही अमेरिका प्रशासनाविरुद्ध आवाज उठवू शकतात. अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्या विद्यापीठांतर्गत कोरोना काळात आॅनलाईन क्लास सुरू आहेत त्या ठिकाणच्या विदेशी विद्यार्थ्यांनी देश सोडून जावे. नॉन इमिग्रेंट एफ १ आणि एम १ या दोन प्रकारच्या व्हिसाअंतर्गत त्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत येण्याची परवानगी असणार नाही. ज्यांचे क्लास आॅनलाईन सुरू आहेत. एफ १ हा व्हिसा नियमित कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना, तर एम १ हा व्हिसा व्होकेशनल कोर्स करणाऱ्यांना दिला जातो.
‘फसवणुकीने ट्रम्प झाले होते पास’
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी मॅरी ट्रम्प यांनी लिहिलेल्या ‘टू मच एंड नेव्हर इनफ : हाऊ माइ फॅमिली क्रिएटेड द वर्ल्डस मोस्ट डेंजेरस मॅन’ या पुस्तकात ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मैरी ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हायस्कूलमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प हे चिटिंग (फसवणूक) करून पास झाले होते. ट्रम्प यांनी अन्य विद्यार्थ्याला आपल्या जागेवर परीक्षा देण्यास बसविले होते. त्यासाठी त्याला पैसे दिले होते. त्यामुळे त्यांना चांगले मार्क पडले आणि युनिव्हर्सिटी आॅफ पेन्सिल्वेनियाच्या व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला.