उघडली हवाना दूतावासाची दारे
By admin | Published: August 16, 2015 12:32 AM2015-08-16T00:32:21+5:302015-08-16T00:32:21+5:30
५४ वर्षांच्या खंडानंतर अमेरिका आणि क्युबा यांचे राजनैतिक मुत्सद्दी संबंध अखेर औपचारिकरीत्या सुरू झाले आहेत. हवानामधील अमेरिकन दूतावासामध्ये अमेरिकेचे सेक्रटरी आॅफ स्टेट
हवाना : ५४ वर्षांच्या खंडानंतर अमेरिका आणि क्युबा यांचे राजनैतिक मुत्सद्दी संबंध अखेर औपचारिकरीत्या सुरू झाले आहेत. हवानामधील अमेरिकन दूतावासामध्ये अमेरिकेचे सेक्रटरी आॅफ स्टेट जॉन केरी यांनी ध्वजवंदन केले. १९६१ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्वाईट डी. आयसेनहॉवर यांच्या कार्यकाळात उतरविलेला अमेरिकेचा ध्वज आज दूतावासावर पुन्हा फडकला.
या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमामुळे गेल्या ७० वर्षांमध्ये हवानाला जाणारे जॉन केरी हे अमेरिकेचे पहिले सेक्रटरी आॅफ स्टेट ठरले आहेत. याप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्रगीतही वाजविण्यात आले. आता आम्ही शत्रू नसून शेजारी देश असल्याची भावना वाढीस लागली आहे, असे मत केरी यांनी या वेळेस व्यक्त केले. मागील वर्षी क्युबन राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आणि गेल्या महिन्यामध्ये क्युबाने वॉशिंग्टनमधील आपला दूतावास सुरू केला.
अखेर आज अमेरिकेने हवानामधील आपला दूतावास पुन्हा सुरू करून संबंध पूर्ववत करण्याचा मार्ग सुकर केला. येत्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध कशाप्रकारचे असतील हे पाहणेही आता महत्वाचे ठरणार आहे.
रिश्तों में खटास जारी हैं...
अमेरिकेने दूतावास जरी सुरू केला असला तरी दोन्ही देशांमध्ये अजूनही सर्वकाही आलबेल नसल्याचा प्रत्यय आजच आला. जॉन केरी आणि क्युबन परराष्ट्रमंत्री ब्रुनो रॉड्रीग्ज यांच्या एकत्र पत्रकार परिषदेमध्येही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि अप्रत्यक्ष शेरेबाजी करण्यात आली.
क्युबासारख्या एकपक्षीय कम्युनिस्ट देशामध्ये इतक्या वर्षांनंतर बोलण्याची संधी मिळाल्यावर केरी यांनी क्युबन लोकशाहीवरच टिप्पणी केली. आपल्या आवडीनुसार नेते निवडण्याची सर्वोत्तम खरीखुरी लोकशाही क्युबन जनतेला मिळावी असे आम्हाला वाटते, असे वक्तव्य केरी यांनी केले. (क्युबामध्ये गेली सहा दशके फिडेल आणि राऊल कॅस्ट्रो सत्तेमध्ये आहेत.)
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने ठरविलेले मानवी अधिकारांच्या मापदंडांची पूर्तता क्युबा सरकारने करावी यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहतील, असेही केरी यांनी या वेळेस सांगितले. केरी यांच्या वक्तव्याचा रॉड्रीग्ज यांनी वेळ न दवडता समाचार घेतला आणि अमेरिकेतील मानवी अधिकारांसंबंधी झालेल्या घटना, वांशिक भांडणे आणि पोलिसांकडून क्रूरपणे वापरल्या गेलेल्या बळाची आठवण करून दिली.
क्युबा-अमेरिका संबंध
आॅक्टोबर १९६०
व्यापारावर प्रतिबंध
जानेवारी १९६१
मुत्सद्दी संबंध थांबले
जुलै २०१५
मुत्सद्दी संबंध सुुरू
केरी हे क्युबाला जाणारे १९४५ नंतर पहिले सेक्रेटरी आॅफ स्टेट ठरले आहेत. शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देशात तणाव होता.