कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा हवी
By admin | Published: November 3, 2014 02:51 AM2014-11-03T02:51:30+5:302014-11-03T02:51:30+5:30
चीनच्या २३ लाख सैनिकांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे, असा इशारा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे.
बीजिंग : चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराबद्दल दोषी ठरविल्यानंतर चीन सरकारने आता आपला रोख सैनिकांकडे वळवला असून, चीनच्या २३ लाख सैनिकांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर संपूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे, असा इशारा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे.
फुजियन येथे झालेल्या लष्करी राजकीय परिषदेत जिनपिंग यांनी हा इशारा दिला आहे. चीनच्या लष्करावर कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाचा संपूर्ण ताबा आहे. त्यामुळे पक्षाची मूल्ये लष्कराने पाळलीच पाहिजेत, असे जिनपिंग म्हणाले.
सेंट्रल मिलिटरी कमिशनचा उपाध्यक्ष शू कैहोऊ याने शिस्तीचा भंग केला असून, त्याचे गंभीर परिणाम लष्करावर होणे शक्य आहे असे सीपीसीचे अध्यक्ष शी निपिंग यांनी म्हटले आहे. शू कैहोऊ याने लाच घेतल्याची कबुली दिली आहे. त्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गेल्या मंगळवारी ही घोषणा केली. त्यानंतर कैहोऊ याची पदावरून तसेच कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)