तालिबानींच्या दहशतीने अफगाणिस्तानात हाहाकार, लोक देश सोडून पळू लागले; विमानतळांवर प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:26 AM2021-08-17T06:26:06+5:302021-08-17T06:27:33+5:30
Afghanistan : तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे.
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. ९० टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे.
तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे. विमानतळावर तालिबानला कब्जा करता आला नसून ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपला दूतावासच विमानतळावर हलविला आहे. तालिबानी तिथे हल्ले करतील या शक्यतेने तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक तैनात आहेत.
सततच्या संघर्षामुळे अफगाणिस्तानात २००१ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, सैनिक, बंडखोरांसह एकूण १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ४३ हजार नागरिक, ४४ हजार अफगाण सैनिक आणि ४२ हजार बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर २०१९नंतर १३ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते. (वृत्तसंस्था)
शेकडो भारतीय अडकून पडले
भारतीय दूतावासातील २०० कर्मचारी व २०० इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसही तिथे अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान काबूलला पोहोचले. याशिवाय २०० शीख बांधव तेथील गुरुद्वारात आहेत. तालिबानने हवाई सीमा बंद केल्याने भारतीयांना आणण्यास गेलेले विमान काबूलमध्ये अडकले आहे. गुरुद्वारात अडकलेले शीख नागरिक सुरक्षित असल्याची माहिती दिल्लीतील गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रमुख मनजीतसिंग शिरसा यांनी दिली.
महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य धोक्यात
तालिबानने २० वर्षांनी सत्ता काबीज केल्यावर जगाशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचा दावा केला. मात्र, लूटमार, महिलांवर अत्याचार याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालिबानने महिलांवर निर्बंध घातले. अफगाणी महिलांना शिक्षण, नोकरीचे स्वातंत्र्य होते. आता महिलांचे हाल होतील, अशी भीती आहे.
भारतीयांची गुंतवणूक धोक्यात
भारतासह काही देशांनी अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली. अनेक भारतीयांनी तेथे व्यवसाय सुरू केले. आज या गुंतवणुकीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतातील अफगाणी नागरिकांचीही चिंता वाढली आहे. भारतात अनेक अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. इतर नागरिकही आहेत. एकीकडे मायदेशी कुटुंबीयांची चिंता तर दुसरीकडे व्हिसाशी संबंधित प्रश्न, अशा दुहेरी संकटात हे विद्यार्थी तसेच अनेक नागरिक अडकले आहेत.
उडत्या विमानातून दोघे कोसळले
हजारो नागरिक थेट विमानांत घुसू पाहत आहेत. तिथे धक्काबुक्की, भांडणे हाणामारी सुरू आहे. अमेरिकी लष्कराच्या विमानात शिरण्यासाठी शिडीवर चेंगराचेंगरी झाली. काही जण विमानावर चढले. दोघे विमानाच्या चाकांमध्ये बसले. विमानाने उड्डाण घेताच ते खाली पडून मरण पावले. विमानाच्या मागेही लोक धावत होते. लोकांना पांगवण्यासाठी तिथे करण्यात आलेल्या गोळीबारात पाच ठार झाले.