Hindu Temples, Bangladesh: संतापजनक! भारताच्या 'या' शेजारी देशात हिंदूंच्या १४ मंदिरांची तोडफोड, मूर्तींचीही विटंबना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:32 PM2023-02-06T13:32:02+5:302023-02-06T13:33:30+5:30
हिंदू लोकांच्या मालमत्तेचेही केले नुकसान, पोलिसांकडून तपास सुरू
Hindu Temples, Bangladesh: अफगाणिस्तान-पाकिस्तानसोबतच बांगलादेशातहीहिंदूंचा छळ सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. बांगलादेशात एकाच वेळी तब्बल १४ मंदिरांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बांगलादेशात राहणारे हिंदू लोक बरेच तणावात आहेत. कारण, या विचित्र घटनांमध्ये काही अंशी त्यांच्या मालमत्तेला हानी पोहोचवली जात आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून हिंदूंना सुरक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
शनिवारी रात्री उशिरा हिंदूंच्या १४ मंदिरांची तोडफोड
अहवालानुसार, बांगलादेशातील वायव्य प्रदेशातील ठाकूरगावच्या बालियाडांगी येथे मंदिरांमध्ये (बांगलादेशी हिंदू मंदिर) तोडफोड करण्याची घटना घडली. गावात राहणारे हिंदू समाजाचे नेते विद्यानाथ बर्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेत मंदिरांवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले करण्यास सुरुवात केली. लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी १४ मंदिरांची तोडफोड केली. या दरम्यान अनेक मूर्तींचे तुकडे तुकडे करण्यात आले तर अनेक मूर्ती जवळच्या तलावात फेकण्यात आल्या.
हल्ल्यानंतर बांगलादेशी हिंदूंमध्ये घबराट
बर्मन म्हणाले की, मंदिरांवर (बांगलादेशी हिंदू मंदिर) हल्ले करणारे हल्लेखोर कोण होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. अंधारामुळे त्यांना कोणीही पाहू शकत नव्हते. ही घटना उघडकीस आल्यापासून या परिसरात राहणारे हिंदू आपल्या सुरक्षेबाबत चिंतेत असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती स्थानिकांकडून केली जात आहे.
हिंदूंच्या जीवाची आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची विनंती
मंदिरांच्या तोडफोडीच्या या घटनेवर संघ परिषदेचे अध्यक्ष आणि हिंदू नेते समर चॅटर्जी यांनी शोक आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. चटर्जी म्हणाले की, हे हिंदू आणि मुस्लिमांचे मिश्र क्षेत्र आहे. येथे मुस्लिम बहुसंख्य आहेत, ज्यांचे हिंदूंशी चांगले संबंध आहेत. दोघांमध्ये कोणताही वाद नाही. अशा परिस्थितीत ही घटना कोणी घडवली, असा प्रश्न पडतो. पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
मंदिरांच्या तोडफोडीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले ठाकूरगावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसेन यांनी सांगितले की, तोडफोडीची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. प्रथमदर्शनी ही बाब परिसरातील शांतता बिघडवण्याचा कट असल्याचे दिसते. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.