हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे प्रयोगशाळेत निरीक्षण
By admin | Published: August 19, 2016 04:27 AM2016-08-19T04:27:17+5:302016-08-19T04:27:17+5:30
काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात या ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे पहिल्यांदा निरीक्षण केल्याचा दावा प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार करणाऱ्या
जेरुसलेम : काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात या ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धान्ताचे पहिल्यांदा निरीक्षण केल्याचा दावा प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. हॉकिंग यांनी ३० वर्षांपूर्वी हा सिद्धांत मांडला होता.
कृष्णविवरातून होणाऱ्या उत्सर्जनाबाबतचा हॉकिंग यांचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी इस्रायल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील भौतिकशास्त्रज्ञ जेफ स्टेईनहावर यांनी प्रयोगशाळेत आभासी कृष्णविवर तयार केले. स्टेईनहॉवर यांचा प्रयोग प्रकाशाऐवजी ध्वनीवर आधारित आहे. आभासी कृष्णविवराचा एक भाग म्हणून माझ्या प्रयोगशाळेत मी हॉकिंग उत्सर्जनाच्या भौतिक परिणामांचे अवलोकन केले, असे ते म्हणाले.
कृष्णविवरातून काहीही अगदी प्रकाशही निसटू शकत नाही, असे शास्त्रज्ञांचे दीर्घकाळ मत होते. तथापि, १९७४ मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी काही कण कृष्णविवरातून निसटू शकतात, असा नवा सिद्धांत मांडला होता. हॉकिंग यांच्या सिद्धांतानुसार, एक कण आणि त्याचे प्रतिद्रव्य उत्स्फूर्तपणे कृष्णविवराच्या काठावर आल्यास या जोडीतील एक भाग कदाचित कृष्णविवरात ओढला जाईल, तर दुसरा निसटेल आणि निसटताना तो कृष्णविवराची काही ऊर्जाही सोबत नेईल. कृष्णविवरे लहान का असतात आणि अखेरीस नष्ट का होतात हे यातून स्पष्ट होईल. तथापि, हे उत्सर्जन अत्यंत क्षीण असल्यामुळे हॉकिंग उत्सर्जनाचे कोणालाही मोजमाप करता आलेले नाही. मोजमापाऐवजी संशोधकांनी या सिद्धांताचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळांत आभासी कृष्णविवरांची निर्मिती केली. (वृत्तसंस्था)
असा केला प्रयोग
द्रव्याच्या अगदी अंशाएवढ्या भागात फोनोन्सची एकमेकांत गुंतलेली जोडी बसवायची आणि नंतर या द्रव्याला प्रचंड वेगाने फिरवून पुढील क्रियेचे निरीक्षण करायचे, असा स्टेईनहॉवर यांचा प्रयोग होता. हे द्रव्य ध्वनीहून अधिक वेगाने फिरू लागल्यानंतर फोनान्सच्या जोडीतील एक निसटतो, असे या प्रयोगात आढळून आले.