इराण हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली
By admin | Published: June 7, 2017 04:51 PM2017-06-07T16:51:48+5:302017-06-07T16:51:48+5:30
इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळाजवळ बुधवारी दुपारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 07 - इराणी संसद आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळाजवळ बुधवारी दुपारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
इराणच्या संसदेत चार हल्लेखोर घुसले आणि बेछूट गोळाबार केला. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावेळी हल्लेखोरांनी संसदेतील लोकांना ओलीस ठेवले होते. हल्लोखोर आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
दुसरीकडे, खोमेनी स्मृतीस्थळावर एका हल्लेखोराने महिलेच्या वेशात येऊन आत्मघाती हल्ला करत स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात सुद्धा अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. इस्लामिक स्टेटने इराणमधील केलेला हा हल्ला पहिलाच असल्याचे समोर येत आहे.
दहशतवादी हल्ल्यांना दोन हात करण्यास आमचे सुरक्षा दल सक्षम आहे. अशाप्रकारे हल्ले करुन दहशतवादी इराणमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे इराणी संसदेचे स्पीकर अली लरिजानी म्हणाले. या हल्ल्यानंतर सुद्धा संसदेचे कामकाज सुरुच ठेवले असून सुरक्षतेच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हॉलचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
इराणच्या संसदेबद्दल-
इराणच्या संसदेला इस्लामिक कन्सल्टेटीव्ह असेम्ब्ली म्हणजेच मजलिस ए शूरा ए इस्लामी असे म्हटले जाते. सध्या इराणी संसदेमध्ये 290 सदस्य निवडून दिले जातात. इराणी संसदेची स्थापना 1906 साली करण्यात आली. सध्या असणारे संसदेचे स्वरुप 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर बदलण्यात आले. सध्या वापरात असलेली इराणी संसदेची ही तिसरी इमारत आहे. आज इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये अयातुल्ला खोमेनी यांच्या कबरीजवळच्या परिसराचाही समावेश आहे. हा परिसर तेहरानच्या दक्षिणेस बेहेश्त ए जाहरा या स्मशानभूमीजवळ आहे. यामध्ये रुहोल्ला खोमेनी यांच्या कबरीसह त्यांची पत्नी खादिजा सखाफी, द्वितीय पुत्र अहमद खोमेनी, माजी अध्यक्ष अकबर हाशेमी रफस्नजनी, माजी उपराष्ट्रपती हसन हबिबी यांच्याही कबरी आहेत. खोमेनी यांच्या निधनानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1989 साली या परिसराचे बांधकाम सुरु करण्यात आले. या कबरींच्या समुहाचा हा परिसर 5000 एकर इतका विस्तृत असून या परिसरात दररोज हजारो लोक, पयर्टक भेट देत असतात. 20,000 गाड्या पार्क करता येतील अशी व्यवस्थाही येथे करण्यात आलेली आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी इराणने 2 अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे सांगण्यात येते.
Iranian media says, Iran Parliament siege over, all four terrorists killed.
— ANI (@ANI_news) June 7, 2017
Islamic State group claims attacks in Tehran: AFP
— ANI (@ANI_news) June 7, 2017