याशा बनला सर्वात कमी वयाचा गणिताचा प्रोफेसर
By admin | Published: April 5, 2017 04:52 AM2017-04-05T04:52:16+5:302017-04-05T04:52:16+5:30
इंग्लंडच्या लिसेस्टर विद्यापीठात १४ वर्षांचा मुस्लिम मुलगा गणिताचा प्रोफेसर बनला आहे
लंडन : इंग्लंडच्या लिसेस्टर विद्यापीठात १४ वर्षांचा मुस्लिम मुलगा गणिताचा प्रोफेसर बनला आहे. याशा एस्ले याची लिसेस्टर विद्यापीठात अतिथी व्याख्याता म्हणून निवड झाली आहे. तो याच विद्यापीठात शिकतोही. त्याला विद्यापीठात सर्वात कमी वयाचा विद्यार्थी आणि कमी वयाचा प्रोफेसर या टोपणनावाने ओळखले जाते. त्याचा गणित विषयाच्या आकलनाचा आवाका प्रचंड आहे. त्याची गणितातील गती थक्क करून सोडते. त्यामुळेच कुटुंबीय त्याला मानवी कॅल्क्युलेटर म्हणतात. याशाचे वडील मुसा त्याला दररोज कारने विद्यापीठापर्यंत सोडतात. त्यांना आपल्या मुलाच्या यशाबद्दल प्रचंड अभिमान आहे. याशाचे पदवीचे शिक्षण जवळजवळ पूर्ण होत आले असून, यानंतर तो पी.एचडी.ची तयारी करणार आहे. प्रोफेसर याशा अॅस्ले म्हणाले की, माझ्यासाठी आपल्या जीवनातील हे सर्वोत्कृष्ट वर्ष आहे. मला नोकरी मिळण्यापेक्षाही इतर विद्यार्थ्यांना मदत करता येते याचा अधिक आनंद आहे. याशाने वयाच्या १३ व्या वर्षी विद्यापीठाशी संपर्क साधला होता. त्याचे वय कमी होते. मात्र, विद्यापीठाची निवड समिती त्याचे गणिताचे ज्ञान पाहून थक्क झाली.
त्यामुळे निवड समितीने याशाला अतिथी व्याख्याता म्हणून निवडले. इराणी वंशाच्या याशाला अतिथी व्याख्यातापद देण्यासाठी विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला लिसेस्टर परिषदेकडून विशेष मुभा घ्यावी लागली होती. लिसेस्टरच्या परिषदेसमोर हा विषय आल्यानंतर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा विश्वासच बसला नाही. मात्र, अधिकारी जेव्हा याशाला भेटले तेव्हा तेदेखील थक्क झाले.