आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:27 AM2019-07-24T11:27:49+5:302019-07-24T11:29:14+5:30
इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे.
वॉशिंग्टन - आई आणि मुलांच्या नात्याचं वर्णन शब्दात करता येऊ शकत नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तसेच काही मुलांचेही आपल्या आईवर जिवापाड प्रेम असते. असाच एक प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फीया येथे इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एक तरुण जीव धोक्यात घालून इमारतीच्या भिंतीवरून चक्क 15 मजले चढून वर गेला. दरम्यान, ही घटना एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जर्मेन असे या आईसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिलाडेल्फीयामधील वेस्टपार्क अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अनेक जण इमारतीत अडकून पडले होते. याच इमारतीत जर्मेनची आई राहत होती. त्यामुळे आग लागल्यानंतर जर्मेनला त्याच्या आईची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखले.
HIGH-RISE FIRE: A man is seen scaling down a 19-story apartment building after a fire in West Philadelphia.https://t.co/Rmujuv7vsbpic.twitter.com/2NsXXYgJVL
— Action News on 6abc (@6abc) July 19, 2019
मात्र आईच्या काळजीने व्याकूळ झालेल्या जर्मेनने इमारतीच्या भिंतीवरून वर चढत जाण्याचा निर्णय घेतला. नंतर तो बाहेरून चढत 15 व्या मजल्यापर्यंत पोहोचला. तेथे आईला सुखरूप पाहिल्यानंतर त्याला हायसे वाटले. तसेच आपण ठीक असून, आता आग नियंत्रणात आली आहे, असे आईने त्याला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आपणास पाहिल्यास आपल्याला अटक करतील म्हणून जर्मेनने पुन्हा इमारतीच्या भिंतीवरून खाली उतरण्याचे ठरवले.
त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवरून खाली उतरला. विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची संरक्षक उपकरणे किंवा दोरखंड यांचा वापर न करता जर्मेन इमारतीवर चढला आणि खाली उतरला. खाली उतरल्यानंतर पोलीस अटक करतील, असे त्याला वाटले होते. मात्र परिस्थिती पाहून पोलिसांनी जर्मेनला केवळ ताकीद देत सोडून दिले.
इमारतींचे बांधकाम करणारा कामगार म्हणून काम करत असल्याने जर्मेनला इमारतींच्या बांधकामाबाबत माहिती होती. त्यामुळेच आपल्याला इमारतीवर सुखरूपरीत्या चढून खाली उतरता आले, असे जर्मेनने सांगितले.