स्वत:ला ‘जाळत’ त्यानं केला विश्वविक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:44 AM2023-07-07T07:44:41+5:302023-07-07T07:45:01+5:30

फ्रान्सच्या ३९ वर्षीय जोनाथन वेरोचंच उदाहरण घ्या. त्याला लहानपणापासून आगीशी खेळण्याचा शौक आहे.

He set a world record by 'burning' himself! | स्वत:ला ‘जाळत’ त्यानं केला विश्वविक्रम!

स्वत:ला ‘जाळत’ त्यानं केला विश्वविक्रम!

googlenewsNext

जगात जी गोष्ट आजपर्यंत कोणीही केलेली नाही, ती गोष्ट आपण करावी, जगात नाव कमवावं, असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. काही जण तर अशा विक्रमांसाठी आपले प्राण पणाला लावण्यासही तयार असतात. अशा प्रयत्नांत प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर; पण काहीही झालं तरी हा विक्रम करायचाच या वेडानं त्यांना पछाडलेलं असतं. 

फ्रान्सच्या ३९ वर्षीय जोनाथन वेरोचंच उदाहरण घ्या. त्याला लहानपणापासून आगीशी खेळण्याचा शौक आहे. पेटत्या आगीचे बोळे तोंडात टाकणं, स्वत:ला पेटवून घेणं, आगीशी जुगलबंदी करणं, स्वत:ला ‘मानवी मशाल’ बनवणं.. आगीबरोबरचे असे ‘खेळ’ तो लहानपणापासूनच करत आला आहे. त्याचे ‘फायर शो’ तर खूपच प्रसिद्ध आहेत. त्याचे अचाट प्रयोग प्रेक्षकांना कायम मंत्रमुग्ध करीत असतात. त्यामुळे त्याचे हे फायर शो पाहण्यासाठी रसिक मोठी गर्दीही करतात. तो प्रोफेशनल स्टंटमन आहे.

आगीशी खेळतानाचे त्याचे स्टंट प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवत असतात. त्यामुळे ‘फायर फायटर’ म्हणूनच त्याला ओळखलं जातं; पण एवढ्यानं जोनाथनचं समाधान झालं नाही. यापेक्षा आणखी काहीतरी भव्यदिव्य आणि अचाट साहस करावं असं त्याच्या मनानं घेतलं.. त्यासाठी त्यानं काय करावं? बराच विचार केल्यानंतर त्याला सुचलं, स्वत:ला पेटवून घेऊन त्या अवस्थेत आपण रनिंग का करू नये? - झालं. त्यानुसार तो कामाला लागला. काही दिवस त्यानं प्रॅक्टिस केली आणि या विक्रमाला तो सज्ज झाला. अनेकांनी त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, कारण गाठ प्राणांशी होती; पण त्यानं कोणाचंच ऐकलं नाही. त्याचं म्हणणं होतं, आग से खेलना तो मेरा बचपन का शौक है.. आग मेरा जीवनसाथी है...

जोनाथननं आपला हेका सोडला नाही आणि आपलं म्हणणं त्यानं खरं केलं. आपलं सर्वांग त्यानं पेटवून घेतलं आणि त्या अवस्थेत त्यानं (स्प्रिंट) रनिंग केली. तेही ऑक्सिजनविना! आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वत:ला पेटवून घेत तो नुसता धावलाच नाही, तर त्यानं तब्बल दोन विश्वविक्रमही केले. पहिला विक्रम म्हणजे स्वत:ला पेटवून घेतलेल्या अवस्थेत शंभर मीटरचं अंतर त्यानं विक्रमी वेळेत पार केलं. एखाद्या कसलेल्या ॲथलीटनं ज्याप्रमाणे धावावं त्याप्रमाणे तो धावला आणि पेटत्या अवस्थेत शंभर मीटर अंतर त्यानं केवळ १७ सेकंदात पार केलं.    
त्यानं दुसरा विश्वविक्रम केला, तो होता पेटत्या अवस्थेत आजपर्यंतचं सर्वाधिक; २७२.२५ मीटर अंतर कापण्याचा! स्वत:ला जळती मशाल बनवून, इतकं मोठं अंतर, तेही ऑक्सिजनविना आजपर्यंत कोणीही कापलेलं नाही. त्याचे हे दोन्हीही विश्वविक्रम नुकतेच गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहेत. जोनाथनचं म्हणणं आहे, या विक्रमानं मी अतिशय खुश आहे; पण मी इथेच थांबणार नाही. मानवी क्षमता किती पणाला लावता येऊ शकतात, यासाठीचे माझे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. हे विश्वविक्रम करताना मी केलेली कामगिरी, ‘फायर फायटर’ म्हणून माझी भूमिका, हजारो लोकांनी मला दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन, माझ्या प्रशिक्षकांनी माझी करवून घेतलेली तयारी.. या साऱ्या गोष्टी अतिशय अविस्मरणीय आहेत. ज्या ज्ञात आणि अज्ञात त्याचप्रमाणे ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला मदत केली, त्या साऱ्यांच्या मी कायम ऋणातच राहू इच्छितो.

जोनाथननं हे जे दोन्ही विक्रम केले, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तर अल्पावधीत लक्षावधी लोकांनी ते पाहिले आणि तोंडात बोटं घातली. केवळ काही मिनिटांतच तब्बल २५ लाख लोकांनी ते पाहिले. दर्शकांची ही संख्या अजूनही वाढतेच आहे. युजर्सनी जोनाथनच्या या साहसावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या विश्वविक्रमाबद्दल अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. काहींनी म्हटलं आहे, विक्रम माेडण्यासाठीच असतात, आधीचा विक्रम जोनाथननं मोडला आहे, पुढे त्याचाही विक्रम कदाचित मोडला जाईल; पण काहींनी त्याला मुर्खातही काढलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, लोक असे ‘येडपट’ रेकॉर्ड्स का करतात आणि इतर लोकही त्यांना उचलून का धरतात, अशा विक्रमांना शीर्षस्थानी ठेवणं म्हणजेदेखील मूर्खपणाच आहे.

असा ‘वेडपटपणा’ मी करतच राहणार! 
जोनाथननं लोकांच्या प्रतिक्रियांवरही उत्तर दिलं आहे. त्याचं म्हणणं आहे, मतभिन्नता असू शकते, ज्यांनी ज्यांनी माझ्या विक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिल्यात, त्या सगळ्यांनाच माझ्याबद्दल काहीतरी वाटतं, आमच्यात काहीतरी प्रेमाचा धागा आहे म्हणूनच काहींनी माझं अभिनंदन केलंय, तर काहींनी मला मुर्खात काढलंय, माझ्यावर टीका केलीय; पण स्वत:ला पणाला लावणं मी सोडणार नाही. विक्रम आणि वैज्ञानिक शोध अशा वेडेपणातूनच जन्माला येत असतात.

Web Title: He set a world record by 'burning' himself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.