त्यांनी गटारात उभारला आशियाना
By Admin | Published: February 7, 2017 02:51 PM2017-02-07T14:51:17+5:302017-02-07T15:05:00+5:30
कोलंबियामधील एक दांपत्य काही तक्रार न करता गेली 22 वर्ष एक गटारात घर करुन संसार करत आहे
>ऑनलाइन लोकमत
बोगोता. दि. 7 - जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक ती जे प्रत्येक गोष्टीची तक्रार करत असतात, तर दुसरे जे मिळेल त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत सुखी आयुष्य जगत असतात. कोलंबियामधील एक दांपत्य अशाच प्रकारे काही तक्रार न करता गेली 22 वर्ष एक गटारात घर करुन संसार करत आहे. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे. गेल्या 22 वर्षापासून एका गटारात ते राहत असून इथे कोणत्याही सुखसोयी त्यांना उपलब्ध नाहीत. पण गरजेपुरतं सामान त्यांनी ठेवलं आहे. या छोट्याशा घरात अतिशय आनंदात ते जगत आहेत.
मारिया ग्रेसिया आणि त्यांचे पती मिगुअल रेस्ट्रेपो यांचा हा सुखी संसार इतरांसाठी उदाहरण ठरत आहे. मारिया आणि मिगुअल यांची जेव्हा भेट झाली तेव्हा दोघेही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले होते. त्यावेळी तो संपुर्ण परिसर हिंसा आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जायचा.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोघेही रस्त्यावरच राहत होते. मात्र एकमेकांच्या सान्निध्यात त्यांना आनंद मिळत होता. याचवेळी त्यांनी अंमली पदार्थांचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला.
एकाही नातेवाईक किंवा मित्राने त्यांना मदत केली नाही. डोक्यावर छप्पर असावं यासाठी त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. पण कोणीच मदतीसाठी पुढे येईना हे लक्षात आल्यावर त्यांनी एका गटारातच आपला संसार थाटला. अंमली पदार्थांचं व्यसन सुटलं आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
गटरात राहणे तसंच सोप्प नव्हतं. पण त्यांनी त्या वास्तूचं एका सुंदर घरात रुपांतर केलं. या घरात त्यांनी गरजेच्या सर्व वस्तू आणल्या. त्यांच्या घरात वीजदेखील उपलब्ध आहे. इतकंच नाही टीव्हीदेखील आहे. इतरांप्रमाणे तेदेखील सणांच्या दिवशी घर सजवतात.