आरोग्याचा मुद्दा प्राधान्याचा व्हावा, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची अपेक्षा

By madhuri.pethkar | Published: September 10, 2017 05:02 PM2017-09-10T17:02:52+5:302017-09-10T17:03:07+5:30

आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. 

Health issue should be preferred, Padmashree Dr. Tatyarao Lahane | आरोग्याचा मुद्दा प्राधान्याचा व्हावा, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची अपेक्षा

आरोग्याचा मुद्दा प्राधान्याचा व्हावा, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांची अपेक्षा

Next

इंडोनेशिया, दि. 10 -  सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड, माजी महापालिका आयुक्त जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे, अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.

स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड म्हणाले, भाषा बाजारपेठेत उभी राहिल्याशिवाय मोठी होत नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न मराठी भाषेला अधिक व्यावहारिक आणि लोकाभिमुख करण्याचा आहे. त्याच भूमिकेतून हे संमेलन 'आरोग्य' या विषयाभोवती गुंफले आहे. मराठी ज्ञानभाषा झाली नाही, तर इंग्रजीशरणता ही आपली अगतिकता ठरणार आहे.

संजय आवटे म्हणाले, विश्व साहित्य संमेलनाने धारणाही वैश्विक करायला हव्यात. कारण, अभिव्यक्तीची माध्यमे वाढत असताना विचार आक्रसला जातोय. गौरी लंकेश यांची हत्या आणि डॉ मेधा खोले यांनी दाखल केलेला एफआयआर ही याची ठळक उदाहरणे आहेत. मराठी माणूस व्यापक झाल्याशिवाय भाषा समृद्ध होणार नाही. एकविसाव्या शतकातील प्रगती आणि त्याचवेळी मध्ययुगीन मानसिकता हे दुभंगलेपण हे आपल्यासमोरचे आव्हान आहे.

सामाजिक संदर्भात काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आणि 'मी' विस्तारला पाहिजे, असे जीवन सोनावणे म्हणाले. दुपारच्या सत्रात वैद्यक साहित्यावर परिसंवाद झाला. पत्रकार संतोष आंधळे, प्रा डॉ वासंती वैद्य, सरल कुलकर्णी, डॉ अरुणा पाटील, सुमन मुठे यांनी त्यामध्ये भाग घेतला.

याच संमेलनात निलेश गायकवाड यांनी लिहिलेल्या 'आकाशपंख', 'थरार उड्डाणाचा', 'माझे अंदमान' या पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्याचप्रमाणे, डॉ शुभा साठे यांच्या 'त्या तिघी', तसेच सुमन मुठे यांच्या 'सहकार चळवळीतील महिला' या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
अरुंधती सुभाष यांनी सूत्रसंचालन झाले.

Web Title: Health issue should be preferred, Padmashree Dr. Tatyarao Lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.