'ए दिल...' आणि 'शिवाय' पाकमध्ये प्रदर्शित होणार नाही
By Admin | Published: October 26, 2016 03:20 PM2016-10-26T15:20:10+5:302016-10-26T16:07:49+5:30
'ए दिल है मुश्किल','शिवाय' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित केले जाणार नाहीत. फॉक्स स्टार आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - 'ए दिल है मुश्किल' आणि 'शिवाय' हे दोन्ही बिग बजेट सिनेमे पाकिस्तानात प्रदर्शित केले जाणार नाहीत. फॉक्स स्टार आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटकडून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याच्या उद्देशाने भारताने पाकिस्तानी कलाकारांना देशात काम करण्यासाठी बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानातही भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानात 'ए दिल है मुश्किल' आणि 'शिवाय' हे सिनेमे प्रदर्शित केले जाणार नसल्याची माहिती व्यापार विश्लेषक तरन आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिली. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर 'ए दिल...'च्या प्रदर्शनाच्या मार्गातील मुश्किल कमी झाल्यानं अखेर हा सिनेमा येत्या 28 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिस झळकणार आहे..
Both #ADHM and #Shivaay WILL NOT release in Pakistan... Fox Star and Reliance Ent confirmed to me... Should put an end to all speculations.
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2016
मनसेने माघार घेत 'ए दिल...' सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी करुन दिल्यानंतर पाकिस्तानातही भारतीय सिनेमे प्रदर्शित केले जातील, असे म्हटले जात होते. मात्र, तशी शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील ' सिनेमा प्रदर्शक आणि वितरक असोसिएशन'सहीत सिनेप्लेक्सिस, मल्टिप्लेक्सिस आणि सिंगल स्क्रिन सिनेमाचे मालक भारतीय सिनेमांवरील बंदी मंगळवारपर्यंत उठवण्याच्या विचारात होते. मात्र तसे काहीही झाले नाही.
आणखी बातम्या
'पाकिस्तानी प्रदर्शक आणि वितरक असोसिएशन'चे अध्यक्ष झोराइज लाशारी यांनी मात्र भारतीय सिनेमांवरील बंदी उठवण्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट, सोमवारी रात्री क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही योजना मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, 'ए दिल है मुश्किल' आणि 'शिवाय' पाकिस्तानात प्रदर्शित होणार नसल्याचे दिसत आहे.