हृदयद्रावक! एनर्जी ड्रिंक पिताच 6 वर्षीय मुलाला हार्ट अटॅक; झाली भयंकर अवस्था अन् गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:31 AM2022-04-26T11:31:44+5:302022-04-26T11:32:44+5:30
एनर्जी ड्रिंक प्यायल्याने सहा वर्षीय मुलाला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. अनेकदा पोटाला थंडावा वाटावा म्हणून शीतपेय घेतलं जातं. यामध्ये एनर्जी ड्रिंकचाही समावेश आहे. सध्या लहान मुलंही एनर्जी ड्रिंक पिताना दिसतात. पण अनेकदा एनर्जी ड्रिंक हे जीवघेणंही ठरू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एनर्जी ड्रिंक एका लहान मुलाच्या जीवावर बेतलं आहे. एनर्जी ड्रिंक प्यायल्याने सहा वर्षीय मुलाला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर-पूर्व मेक्सिकोतील माटामोरोसमधील 6 वर्षांचा फ्रान्सिस्को एक ग्लास एनर्जी ड्रिंक प्यायला. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. द मिररच्या रिपोर्टनुसार फ्रान्सिस्कोला तहान लागली होती. तहान भागवण्यासाठी तो मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक प्यायला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या कुटुंबाने त्याला पुमारेजो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचं ब्रेन डेड झाल्याचं सांगितलं. 6 दिवस तो कोमात होता. त्याची आई जेसिकाने त्याला आर्टिफिशिअल लाइफ सपोर्ट मशीनवर हटवण्याची परवानगी दिली नव्हती. रिपोर्टनुसार फ्रान्सिस्कोला दुसरा कोणता आजार होता की नाही याची माहिती मिळालेली नाही. पण आरोग्य तज्ज्ञांनी लहान मुलांनी एनर्जी ड्रिंक पिऊ नये, असा सल्ला दिला आहे. यामध्ये कॅफीन आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं.
मुलाच्या मृत्यूनंतर संबंधित एनर्जी ड्रिंक कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एनर्जी ड्रिंकमुळे हार्ट अटॅक येण्याचं किंवा मृत्यू होण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. फॅब डेलीच्या रिपोर्टनुसार याआधीही एका व्यक्तीला जास्त एनर्जी ड्रिंक प्यायल्याने हार्ट अटॅक आला होता. तर एका व्यक्तीला एनर्जी ड्रिंकचं व्यसन लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.