युरोपमध्ये मुसळधार; पुरामुळे १२५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:50 AM2021-07-18T08:50:39+5:302021-07-18T08:53:06+5:30
युरोपमधील जर्मनी व बेल्जियम, नेदरलँड या देशांमध्ये मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरे कोसळली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.
बर्लिन : युरोपमधील जर्मनी व बेल्जियम, नेदरलँड या देशांमध्ये मुसळधार पाऊस व नद्यांना आलेल्या पुरामुळे १२५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे कोसळली असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. काही ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे १३०० लोक बेपत्ता असून, त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.
जर्मनीचा पश्चिम भाग व बेल्जियममध्ये पाऊस, पुराने थैमान घातले आहे. जर्मनीतील ऱ्हाईनलँड-पॅलटीनेट प्रांतामध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्याने ६० जणांचा मृत्यू झाला आहे. सिन्झिंग शहरामध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या गृहसंकुलात अचानक पुराचे पाणी शिरून १२ जण बुडून मरण पावले.
नॉर्थ ऱ्हाइन-वेस्टफालिया या भागात पावसाच्या तडाख्याने ४३ जणांनी जीव गमावला आहे. जर्मन सरकारने सांगितले की, पाऊस व पुराने केलेला विध्वंस धक्कादायक आहे.
या घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसदारांना सरकारकडून मदत दिली जाईल. जर्मनीमधील एरफ्टस्टाड या शहरामध्ये पुराच्या पाण्यामुळे घरातच अडकून पडलेल्या सुमारे १०० लोकांची सुटका करण्यात आली. हे बचावकार्य शनिवार सकाळपर्यंत सुरू होते. नेदरलँडमधील रोअरमाँड भागात पावसामुळे आलेल्या पुराने अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, काही जणांचा बळी गेला आहे.
सर्वांत जास्त फटका बेल्जियमला
युरोपमध्ये जर्मनीनंतर पाऊस व पुराचा सर्वांत जास्त तडाखा बेल्जियम या देशाला बसला आहे. तेथे आतापर्यंत १८ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियमचे गृहमंत्री ॲनेलिस व्हेर्लिंडेन यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे १९ जण बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मेऊस नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, दोन्ही काठांच्या जवळ असलेल्या अनेक घरांची पडझड झाली आहे.
अनेक मोटारी गेल्या वाहून
- पश्चिम युरोपमध्ये या आठवड्यात संततधार सुरू असून, पुराचे पाणी अनेक भागांत शिरले. त्यात रस्त्यांवर उभ्या असलेल्या अनेक मोटारी वाहून गेल्या.
- घरे भुईसपाट झाली. बेल्जियममध्ये बचावकार्यासाठी इटलीने मदतपथके पाठविली आहेत.