मुसळधार पावसाने कहर, ४८ तासात १८ लहान मुलांसह ३७ जणांचा मृत्यू; भूस्खलनामुळे रस्ते बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 11:21 AM2024-03-04T11:21:06+5:302024-03-04T11:21:53+5:30
पाकिस्तानात गेल्या ४८ तासात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७ जणांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानातील अनेक भागात भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये गेल्या ४८ तासात मुसळधार पावसाने मोठं नुकसान केले आहे. पाकिस्तानमध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात १८ लहान मुलांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण पाकिस्तानमध्ये पावसामुळे घरे कोसळली आणि अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. उत्तर-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अनेक रस्ते बंद आहेत.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात गुरुवारी रात्रीपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, यात बहुतेक लहान मुले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले की, पावसामुळे बाधित झालेल्या लोकांना नुकसानीची योग्य ती भरपाई दिली जाईल.
"गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरताहेत"; कमला हॅरिस यांनी केली युद्धबंदीची मागणी
दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर या किनारी शहराला पूर आल्याने किमान पाच जणांचा मृत्यू झाला. ग्वादरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि शेकडो लोक बेघर झाले.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेली माहिती अशी की, पाकव्याप्त काश्मीरमध्येही जीवितहानी आणि नुकसान झाले आहे आणि या भागात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्ग अडवणारे ढिगारा साफ करण्यासाठी आपत्कालीन मदत आणि अवजड यंत्रसामग्री या भागात रवाना करण्यात आली आहे.