दरड कोसळून बांगलादेशात 12 रोहिंग्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 03:31 PM2018-06-13T15:31:50+5:302018-06-13T15:32:06+5:30
मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.
ढाका- बांगलादेशात आश्रयासाठी आलेल्या रोहिंग्यांचे प्रश्न अजूनही संपलेले नाहीत. बांगलादेशातील कॉक्स बझार या जिल्ह्यात 10 लाखांच्या आसपास रोहिंग्या छावणीमध्ये राहात आहेत. मॉन्सूननंतर या छावणीतील रोहिंग्यांच्या त्रासामध्ये अधिकच भर पडली आहे. दरड कोसळल्यामुळे 12 रोहिंग्यांचे प्राण गेले आहेत.
सोमवारी मातीखाली गाडल्या गेल्यामुळे एका लहान मुलाचे कुतुपालोंग छावणीत प्राण गेले होते. रोहिंग्या छावणी डोंगराळ प्रदेशाला लागून असल्यामुळे छावणीतील 2 लाख लोकांना दरडीखाली येण्याचा थेट धोका आहे. तसेच मॉन्सूनमुळेही त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. आश्रय छावणी बांधण्यासाठी येथील टेकड्यांवरील झाडांची तोड करण्यात आली होती त्यामुळे तेथील उतारावरील जमिनीचा आधारच नाहिसा झाला आहे. मॉन्सून येण्यापुर्वी 29 हजार रोहिंग्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. दरडीमुळे सध्या 30 घरांचे नुकसान झाले आहे.
या परिसरामध्ये आतापर्यंतच 2.5 मी इतका पाऊस पडला आहे. इंग्लंडमध्ये वर्षभरात जितका पाऊस पडतो त्यापेक्षा हा तिप्पट पाऊस आहे. गेल्या वर्षी मॉन्सूनमुळे दरड कोसळून कॉक्स बझार आणि चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात 70 लोकांचे प्राण गेले होते. दरडींबरोबर पूराचा धोकाही असल्यामुळे रोहिंग्यांच्या छावण्या अधिकच संकटात सापडल्या आहेत.